अर्थमंत्र्यांची 'लस' प्रभावी ठरणार की 'आणखी एक पॅकेज' अशी नोंद होणार..शिवसेनेचा टोला - Shiv Sena's reaction to Union Finance Minister Nirmala Sitharaman package | Politics Marathi News - Sarkarnama

अर्थमंत्र्यांची 'लस' प्रभावी ठरणार की 'आणखी एक पॅकेज' अशी नोंद होणार..शिवसेनेचा टोला

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 30 जून 2021

केंद्र सरकारने ‘कर्जहमी’ दिली हे खरे, पण पर्यटन व्यवसायाच्या ‘हमी’चे काय?

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच विविध क्षेत्रांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असताना अर्थमंत्री सीतारमण यांनी जाहीर केलेल्या पॅकेजवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आले आहे.Shiv Sena's reaction to Union Finance Minister Nirmala Sitharaman package

''सरकारकडून जाहीर होणारी आर्थिक पॅकेज ही तशी टीकेची धनीच होत असतात. या टीकेत तथ्य नसते असे नाही, पण कोरोना महामारीमुळे तडाखा बसलेल्या सर्वच क्षेत्रांना आर्थिक मदतीचा हात देऊन पुन्हा उभे करणे केंद्र सरकारचे मुख्य कर्तव्यच आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनुभव भयंकर होता. आरोग्य सुविधांच्या कमतरतेमुळे लाखो रुग्णांचे हाल झाले. शेकडो रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला. कोरोनामुळे आरोग्य आणि इतर क्षेत्रांना सांभाळणे, उभे करणे हे केंद्र सरकारपुढील सर्वात मोठे आव्हान आहे . त्या दृष्टीने 1 लाख 10 हजार कोटींचे आर्थिक लसीकरण करण्याचा प्रयत्न सरकारने केला, असे म्हणता येईल. आता ही ‘लस’ अर्थव्यवस्थेसाठी ‘प्रभावी’ ठरते की ‘आणखी एक पॅकेज’ अशी त्याची नोंद होते हे भविष्यातच समजेल,'' असा टोला 'सामना'च्या अग्रलेखात लगावला आहे. 

अर्थमंत्र्यांचा ‘बुस्टर डोस’ कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी केंद्र सरकारने 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. आता दुसरी लाट ओसरल्यावर 1 लाख 10 हजार कोटींचा ‘बुस्टर डोस’ जाहीर केला. त्यातील 60 हजार कोटी हे आरोग्य वगळता इतर क्षेत्रांसाठी ‘कर्जहमी’ या स्वरूपात आहे. त्याचा फायदा प्रामुख्याने देशातील लघु, मध्यम व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक, पर्यटन संस्था यांना होणार आहे. त्यांना कर्जहमीच्या स्वरूपात केंद्र सरकारने दिलासा दिला हे बरे केले. अर्थात, हा दिलासा थेट अर्थसहाय्याच्या स्वरूपात नसून विनातारण कर्जस्वरूपात आहे, हा मुद्दादेखील आहेच, असं अग्रलेखात म्हटलं आहे. 
 
पर्यटन व्यवसायासाठी हा दिलासा ‘म्हटला तर आहे, म्हटला तर नाही’ अशा स्वरूपाचा आहे. केंद्र सरकारने ‘कर्जहमी’ दिली हे खरे, पण पर्यटन व्यवसायाच्या ‘हमी’चे काय? खरी गरज पर्यटन व्यवसाय सुरू होण्याची आहे. 

मृतांची संख्या आणि वेग एवढा भयंकर होता की, अंत्यसंस्कारांसाठी स्मशाने अपुरी पडली. तेथे मृतदेहांच्या रांगा लागल्याची भीषण दृश्ये मनाचा थरकाप उडविणारी होती. उत्तर प्रदेशसारख्या राज्यात तर कोरोनामुळे मरण पावलेल्यांचे मृतदेह गंगेत सोडून देण्याची वेळ जनतेवर आली होती.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख