कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यावर शिवसेनेचा हल्ला...‘‘सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत.’’  - Shiv Sena's attack on Karnataka's Deputy Chief Minister Your arrears will be destroyed from Karnataka | Politics Marathi News - Sarkarnama

कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यावर शिवसेनेचा हल्ला...‘‘सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत.’’ 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

‘‘सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत.’’ याद राखा! सूर्य-चंद्राच्याच साक्षीने कर्नाटकातून तुमची अरेरावी नष्ट होईल व मराठी बांधवांचा लढा यशस्वी होईल," असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

मुंबई : ‘‘सूर्य-चंद्र असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहील,’’ अशी अरेरावीचे भाषा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केली आहे. त्याला शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून टिकास्त्र सोडले आहे. "कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी एक लक्षात घ्यावे, सूर्य-चंद्र महाराष्ट्रासही तेजाने प्रकाशमान करीत असतात. आचार्य अत्रे यांच्याच भाषेत सांगायचे तर ‘‘सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत.’’ याद राखा! सूर्य-चंद्राच्याच साक्षीने कर्नाटकातून तुमची अरेरावी नष्ट होईल व मराठी बांधवांचा लढा यशस्वी होईल," असा इशारा शिवसेनेने दिला आहे.
 
सूर्याच्या ढळढळीत प्रकाशझोतात बेळगावचा लढा सुरू आहे. त्याच सूर्यप्रकाशात कानडी पोलीस ‘जय महाराष्ट्र’ म्हणणाऱया मराठी बांधवांवर अत्याचार करीत आहेत व रात्रीच्या अंधारात, चंद्राच्या शीतल प्रकाशात छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवीत असतात. पण तेथील मराठी बांधवांचे मनोधैर्य खचले नाही हाच शिवरायांचा आशीर्वाद आहे. कर्नाटक सरकारचा 1नोव्हेंबर हा स्थापना दिवस असतो.

हा दिवस सीमा भागातील मराठी लोक ‘काळा दिवस’ म्हणून पाळतात. ही वेळ 20 लाख मराठी बांधवांवर कोणी आणली? भाषावार प्रांतरचना केल्यावर मराठी भाषिकांना त्यांच्या हक्काच्या राज्यात जाण्याचा अधिकार का नाकारला गेला? 20 लाख मराठी भाषिकांचा आक्रोश, किंकाळ्या, सांडलेले रक्त आणि बलिदानाची पर्वा न करता निव्वळ दडपशाही मार्गाने मराठी भावना चिरडून त्यांना कानडी मुलखात कोंबले हा अन्याय नाही का? असा सवाल शिवसेनेचे उपस्थित केला आहे. 

महाराष्ट्राची बांधिलकी बेळगावसह संपूर्ण सीमा बांधवांशी आहे. सीमाप्रश्नी 69 हुतात्मे देणारा शिवसेना हाच एकमेव पक्ष आहे. सीमा प्रश्नासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रदीर्घ तुरुंगवास भोगला आहे. महाराष्ट्रातील नेते कितीही ओरडत असले तरी जोपर्यंत सूर्य-चंद्र आहेत तोपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहणार असल्याची आरोळी तेथील उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी ठोकली आहे. अशा आरोळय़ांची पर्वा न करता गेल्या 70 वर्षांपासून सीमा भागातील मराठी बांधवांचा लढा सुरूआहे.

हा जो कोणी लक्ष्मण सवदी गोधडीत रांगत होता त्याआधीपासून 20 लाख मराठी बांधव महाराष्ट्रात येण्यासाठी संघर्ष करीत आहेत. सध्या बेळगावचा तिढा सर्वोच्च न्यायालयात लटकला आहे. त्यामुळे आता न्यायालयच काय ते ठरवेल. सूर्य-चंद्र आकाशात आहेत की नाहीत हे पाहून सर्वोच्च न्यायालय बेळगावप्रश्नी निकाल देणार नाही आणि सूर्य-चंद्र हे काही कुणाच्या बापाचे नोकर नाहीत, असे अग्रलेखात स्पष्ट केले आहे. 

पंतप्रधान मोदींची वेळ मिळवून द्यायला मदत केली पाहिजे. सीमा भागातील जनतेला पाठिंबा म्हणून 1 नोव्हेंबरला महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी ‘काळा दिवस’ पाळला व दंडास काळ्या फिती बांधून काम केले. या आंदोलनात महाराष्ट्रातील भाजपसह इतर राजकीय पक्षही सामील झाले असते तर मराठी ऐक्याचे जोरदार दर्शन कानडी राज्यकर्त्यांना घडले असते. निदान दोन विरोधी पक्षनेत्यांनी तरी दंडास काळ्या फिती बांधून मराठी जनांच्या भावनेचा मान राखायला हवा होता. 

चंद्रकांतदादा पाटलांचे आभार 

कर्नाटकात भाजपचे राज्य आहे व त्या राज्यात मराठी बांधवांवर अत्याचार सुरू असतील तर महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांचे मन अश्रूंनी भिजलेच पाहिजे. तसे का झाले नाही हे त्यांनाच माहीत. नाही म्हणायला चंद्रकांतदादा पाटलांनी बेळगावसह मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात यायलाच हवीत, असे म्हटल्याचे प्रसिद्ध झाले आहे. त्याबद्दल पाटलांचे आभार! महाराष्ट्राची बांधिलकी बेळगावसह संपूर्ण सीमा बांधवांशी आहे. सीमाप्रश्नी 69 हुतात्मे देणारा शिवसेना हाच एकमेव पक्ष आहे. सीमा प्रश्नासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रदीर्घ तुरुंगवास भोगला आहे. सीमा भागात जेव्हा जेव्हा मराठी बांधवांवर कानडी सरकारचे हल्ले झाले, त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले.  

 Edited  by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख