शिवसेनेचा नरेंद्र मोदींवर निशाना...कंगनालाही टोला - Shiv Sena targets Prime Minister Narendra Modi  also targets actress Kangana Ranaut | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेचा नरेंद्र मोदींवर निशाना...कंगनालाही टोला

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

लाल चौकात तिरंगा फडकवण्यास गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांना कश्मीरच्या पोलिसांनी रोखले व बंदी बनवले. हे चित्र काय सांगते?

मुंबई : "नकट्या नटीने लाल चौकातील न फडकलेल्या तिरंग्यासाठी संतापाच्या ठिणग्या उडवाव्यात. खरी मर्दानगी व मर्दानी तेथेच आहे, कश्मीरात सध्या राष्ट्रपती राजवट आहे. म्हणजे तेथे दिल्लीचा हुकूम चालतो, पण लाल चौकात तिरंगा फडकवणे हा गुन्हा ठरला. मग 370 कलम हटवल्यावर नक्की बदलले काय?" असा सवाल सामनाच्या अग्रलेखात करण्यात आला आहे. 

अभिनेती कंगना राणावत आणि केंद्रसरकारवर सामनातून आज टीका केली आहे. एखाद्या भूमीवर तिरंगा फडकवण्यास बंदी आहे याचा सरळसोट अर्थ असा की, त्या भूमीचे आम्ही स्वामी नाही! त्या भूमीवर दुसऱ्याच कुणाचा तरी हुकूम चालत आहे. ते हुकूमबाज एकतर दहशतवादी आहेत अथवा परके आहेत. मुंबईत आजही तिरंगा फडकतोय. म्हणजे हा भाग पाकड्यांचा नाही. जेथे पाकड्यांची मिजास चालते तेथेच तिरंग्याचा अपमान होतो, असे अग्रलेखात म्हटलं आहे. 

'सामना'मधून काश्मीर आणि 370 कलम याविषयी भाष्य केले आहे. 370 कलम असताना बाहेरच्या लोकांना येऊन तेथे एक इंच जमीन घेता येत नव्हती. बाहेरच्यांना तेथे जाऊन उद्योग, व्यापार करता येत नव्हता. त्यामुळे 370 कलम काढल्यानंतर तेथे व्यापार, उद्योग वाढेल असे चित्र निर्माण केले होते. काही बडय़ा उद्योगपतींनी देशभक्तीने प्रेरित होऊन कश्मीरात मोठी गुंतवणूक करण्याचेही जाहीर केले, पण वर्ष उलटून गेले तरी तेथे एक रुपयाचीही गुंतवणूक होऊ शकलेली नाही. 

मोदी सरकारने 370 कलम हटवून कश्मीरच्या पायांतील गुलामीच्या बेड्या तोडून फेकल्या. त्याबद्दल सगळ्यांनीच कौतुकाचा वर्षाव केला. 370 कलम हटवून भारतमातेचा गुदमरलेला श्वास मोकळा केला. हे सर्व मोदी व शहा यांचे राज्य दिल्लीत असल्यामुळेच घडले, पण 370 कलम हटवूनही भाजप कार्यकर्त्यांना चारेक दिवसांपूर्वी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवता आला नाही. लाल चौकात तिरंगा फडकवण्यास गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांना कश्मीरच्या पोलिसांनी रोखले व बंदी बनवले. हे चित्र काय सांगते? अशी टीका मोदींवर करण्यात आली आहे.  

संबंधित लेख