शिवसेना पडली एकाकी.. संपर्क प्रमुख मिळेना..  - Shiv Sena Solapur district does not have Contact Head. Who is responsible for the election  | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेना पडली एकाकी.. संपर्क प्रमुख मिळेना.. 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

सोलापूर जिल्ह्याला संपर्कप्रमुख मिळू शकत नाही, हे दुर्दैवच असल्याची चर्चा जुन्या शिवसैनिकांमध्ये सुरु आहे. 

सोलापूर : राज्याच्या सत्तेची दोरी स्वत: पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे असतानाही आणि युवासेना प्रमुख कॅबिनेट मंत्री असतानाही सोलापूर जिल्ह्याला संपर्कप्रमुख मिळू शकत नाही, हे दुर्दैवच असल्याची चर्चा जुन्या शिवसैनिकांमध्ये सुरु आहे. 

राष्ट्रवादीने महापालिका, नगरपालिका, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची धुरा आमदार संजय शिंदे यांच्याकडे तर कॉंग्रेसने आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर सोपविली आहे. मात्र, शिवसेनेकडून कोण, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज तानाजी सावंत हे पक्षीय राजकारणातून बाजूलाच झाल्याचे सध्याचे चित्र आहे. तर त्यांचे बंधू तथा जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत हेदेखील पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नसल्याची चर्चा आहे. 

दुसरीकडे पक्षांतर्गत कुरघोडीला वैतागलेले महापालिकेतील विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनीही पक्षांतराची मानसिकता तयार केली आहे. तुर्तास, त्यांनी स्वत:च राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, विद्यमान विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांची कोठेंशी जवळकीता पाहून आगामी बदलत्या राजकारणाची चाहूल आतापासूनच लागल्याचीही चर्चा आहे. कोठे यांच्या संपर्कात भाजप, शिवसेना, कॉंग्रेसमधील काही नगरसेवक असल्याचीही चर्चा आहे. 

राज्यातील महाविकास आघाडीने ठरवलेल्या अजेंड्यामुळे कोठेंचा अधिकृत प्रवेश लटकला असला, तरीही त्यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी जवळीकता साधायला सुरवात केली आहे. काही झाले तरी, आगामी महापौर राष्ट्रवादीचाच असेल, असा विश्‍वास कोठेंनी पालकमंत्र्यांना दिल्याची चर्चा आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसने महापालिकेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जबाबदारी आमदार संजय शिंदे यांच्याकडे तर कॉंग्रेसचे नूतन कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे त्यांच्या पक्षाची जबाबदारी असणार आहे. 

तत्कालीन शहरप्रमुख, सहसंपर्कप्रमुखांना पक्षाने पदावरुन काढून टाकले आहे. माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे हे देखील विद्यमान पदाधिकाऱ्यांवर नाराज असून कोठेंना रोखता आले असते, असा प्रश्‍न उपस्थित करुन त्यांनी विद्यमान पदाधिकाऱ्यांवर काही दिवसांपूर्वी टिका केली होती. कधी नव्हे ते, शिवसेनेत दोन गट पडल्याची चर्चा सुरु झाली आहे. कोठे यांच्यासोबत त्यांचे समर्थक नगरसेवकांनी पक्षांतर केल्यास शिवसेनेचे शहरातील भविष्य काय, असाही प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर पक्षप्रमुख जिल्ह्याला कायमचा संपर्कप्रमुख अथवा संपर्कप्रमुख देतील का, याची उत्सुकता लागली आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख