''हा शिवसेनेवर अन्याय..राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आम्ही खापर फोडले नाही..'' - Shiv Sena mp Sanjay Raut reaction to NCP regarding Khed Panchayat Samiti | Politics Marathi News - Sarkarnama

''हा शिवसेनेवर अन्याय..राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आम्ही खापर फोडले नाही..''

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 5 जून 2021

शिवसेनेचे सदस्य पळवून नेणे, त्यांना फुटण्यासाठी आमिष दाखवलं आहे.

खेड (पुणे)  : शिरूर लोकसभा मतदारसंघात आजी-माजी खासदारांच्या कलगीतुऱ्याने महाविकासआघाडीत बिघाडी होऊ शकते, असे असताना खेड पंचायत समिती सभापतीच्या निवडीवरून शिवसेनेचे माजी खासदार आणि राष्ट्रवादीचे आमदार एकमेकांसमोर उभे ठाकलेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज खेडच्या दाैऱ्यांवर आहेत. Shiv Sena mp Sanjay Raut reaction to NCP regarding Khed Panchayat Samiti

संजय राऊत म्हणाले, "शिवसेनेच्या सभापतीपदावर आणलेला अविश्वास ठराव त्यानिमित्ताने झालेला गोंधळ, हा शिवसेनेवर अन्याय आहे, शिवसेनेचे सदस्य पळवून नेणे, त्यांना फुटण्यासाठी आमिष दाखवलं आहे, सरकारमध्ये आपण एकत्रित काम करीत आहोत. राज्यात तीन पक्षांचा समन्वय चांगला आहे, तो प्रदीर्घ काळ राहावा, अशी आमची इच्छा आहे. खेडसारख्या विषयावरून कुठेतरी कटुता निर्माण होते, राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आम्ही खापर फोडले नाही."

खेडचे सभापती शिवसेनेचे भगवान पोखरकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल झाला होता. इथल्या महाविकासआघाडीत सुरळीपणा नव्हताच आणि याला राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील हेच सर्वस्वी जबाबदार आहेत, असा आरोप करत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी निशाणा साधला होता.   

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरेंकडे माजी खासदारांनी मोठ्या चौकशीची मागणी करावी. या दुष्कृत्यात मी दोषी आढळलो तर शिक्षा भोगायला मी तयार आहे. पण तथ्य न आढळल्यास आढळरावांनी तोंड काळं करूनच तालुक्यात फिरावं, असा पलटवार आमदार दिलीप मोहितेंनी केला होता. 
 
पंचायत समिती सभापतीवरील अविश्वास ठरावावरून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत पेटलेला वाद, कार्यकर्त्यांमध्ये झालेला राडा अन् वाढता संघर्ष दोन्ही पक्षांतील नेत्यांची डोकेदुखी वाढवणारा ठरत आहे. राज्यात महाविकास आघाडीमध्ये दोन्ही पक्ष एकत्रित असताना तालुक्यात मात्र माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. यापार्श्वभूमीवर संजय राऊत खेड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. आढळराव आणि मोहिते पाटील यांच्या संघर्ष कमी करण्यासाठी राऊत प्रयत्न करणार की शिवसैनिकांना बळ देणार, याबाबत उत्सुकता आहे. 

Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख