शिवसेना खासदारांचा आंदोलनाचा इशारा..  - Shiv Sena MP  Warning of agitation | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेना खासदारांचा आंदोलनाचा इशारा.. 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

एअर इंडियाने मागीलवर्षी देशभर सुरु केलेल्या नोकरभरतीस फक्त मुंबईतच स्थगिती देण्यात आल्याबद्दल शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर व अरविंद सावंत यांनी निषेध नोंदविला  आहे.

मुंबई : एअर इंडियाने मागीलवर्षी देशभर सुरु केलेल्या नोकरभरतीस फक्त मुंबईतच स्थगिती देण्यात आल्याबद्दल शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर व अरविंद सावंत यांनी निषेध नोंदविला आणि शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यामुळे पाच महिन्यांत ही नोकरभरती करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिले आहे.

एअर इंडियामध्ये मागीलवर्षी ऑगस्ट महिन्यात पर्सर, हवाई सुंदरी आदी पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. जेट, गोएअर, इंडिगो यासारख्या विमान कंपन्यांमधील अनुभवी व्यक्तींना त्यात निवडण्यात आले. त्यांची वैद्यकीय तपासणी तसेच हैदराबाद येथे प्रशिक्षण देखील पूर्ण झाले.

नंतर अचानक एअर इंडियाने फक्त मुंबईतील भरती प्रक्रिया अचानक स्थगित  केली. त्यामुळे मुंबई-महाराष्ट्रातील उमेदवारांवर अन्याय झाल्याचा मुद्दा कीर्तीकर यांनी फेब्रुवारीमधील अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उपस्थित केला होता. त्यांना लगेच सेवेत घेण्याची मागणीही त्यांनी केली होती. त्यावर या सर्व उमेदवारांना एअर इंडियाच्या सेवेत लौकरच समाविष्ठ केले जाईल, असे आश्वासन केंद्रीय हवाई वाहतूक खात्याचे मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिले होते.  

या आश्वासनाला सात महिने झाल्यामुळे त्यासंदर्भात आठवण करून देण्यासाठी कीर्तीकर व दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी पुन्हा पुरी यांची भेट  घेतली. सध्या एअर इंडियाच्या सेवेचा विस्तार सुरु असल्याने  या अनुभवी उमेदवारांना एअर इंडियाने तत्काळ सेवेत समाविष्ठ करून घ्यावे, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली. या निवेदनावर शिवसेनेच्या सर्व खासदारांच्या स्वाक्षऱ्या होत्या.

यासंदर्भात त्वरेने निर्णय घेण्यात यावा. याबाबत विभागाने सकारात्मक भूमिका न घेतल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन केले  जाईल, असा इशाराही या खासदारांनी दिला. त्यावर येत्या पाच महिन्यांत या सर्व उमेदवारांना सेवेत समाविष्ठ करून घेतले जाईल, असे आश्वासन पुरी यांनी दिले. यावेळी एअर इंडियाच्या संचालिका (एचआर) श्रीमती अम्रिता शरण उपस्थित होत्या. ही माहिती कीर्तीकर यांच्या कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आली आहे.  

हेही वाचा : कंगनाच्या बंगल्याचे बांधकाम कधीचे ?  
मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतच्या बंगल्यातील महापालिकेने जमीनदोस्त केलेले बांधकाम पूर्वीपासून होते की नव्याने बांधण्यात येत होते, याचा खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत. तर समाजमाध्यमांवर सरकार विरोधात मत मांडले म्हणून ही कारवाई केली, असा आरोप कंगनाकडून करण्यात आला आहे. तर महापालिकेने नियमानुसार कारवाई केली, असा दावा पुन्हा पुरवणी प्रतिज्ञापत्रात केला आहे. पाली हिल येथील कंगनाच्या बंगल्यामधील कथित अवैध बांधकामावर महापालिकेने कारवाई केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख