राऊत म्हणाले, 'ती' पहाट पुन्हा कधीच येणार नाही... - Shiv Sena leader MP Sanjay Raut said that day will never come | Politics Marathi News - Sarkarnama

राऊत म्हणाले, 'ती' पहाट पुन्हा कधीच येणार नाही...

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिल्याच्या त्या बातमीने राजकीय वर्तुळात हलकल्लोळ माजला.

मुंबई :  भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली होती, याला आज एकवर्ष झाले. राजकीय घडामोडीनंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. 'हे सरकार पाच वर्ष टिकणार नाही,' अशी टीका भाजपचे नेते नेहमीच करीत आहेत. याबाबत शिवेसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की 'ती' पहाट पुन्हा कधीच येणार नाही..   

२३ नोव्हेंबर, २०१९ ची पहाट उगवली तिच एक धक्कादायक राजकीय बातमी घेऊन. भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिल्याची त्या बातमीने राजकीय वर्तुळात हलकल्लोळ माजला. पण ही खेळी नंतर फसलीच. आज त्या फसलेल्या शपथविधीची वर्षपूर्ती!

विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. मी पुन्हा येणार...अशी गर्जना देवेंद्र फडणवीसांनी केली होती. आपणच मुख्यमंत्री होणार, याबाबत फडणवीसांना अपेक्षा होती. राज्यात दीडशे जागा मिळणार असे भाजप नेते सांगत होते. पण त्यांना १०५ जागा मिळाल्या. बहुमतासाठी १४५ आमदारांची आवश्यकता होती. भाजपने १५२ जागा लढल्या होत्या. सत्तेतले त्यांचे भागिदार शिवसेनेने १२४ जागी उमेदवार दिले होते. तर एनडीएतल्या मित्र पक्षांनी १२ जागा लढवल्या होत्या. शिवसेनेचे ५६ उमेदवार निवडून आले. 

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांचं बंड मोडून काढलं आणि पवार यांनी शिवसेना आणि काँग्रेससोबत नवी मोट बांधली. त्यामुळे २३ नोव्हेंबरला पहाटे झालेल्या शपथविधीनंतरचं फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद अल्पजीवी ठरलं. त्यांना अवघ्या ८० तासांत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

महाराष्ट्राच्या जनतेने कौल दिला असतानाही शिवसेनेने युती तोडल्याने राज्यात स्थिर सरकार यावे म्हणून आम्ही राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेत्यांकडे विचारणा केली. त्यांनी स्थिर सरकारच्या मुद्द्यावर आम्हाला पाठिंबा दिला, असे फडणवीस त्यावेळी म्हणाले होते. सरकार स्थापन होत नव्हते. कुणीतरी दोघांनी किंवा तिघांनी एकत्र आल्याशिवाय सरकार बनणार नाही, असे आपण शरद पवार यांना सांगितले होते. त्यामुळे भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला असे अजितदादा म्हणाले होते. पण शेवटी शरद पवार यांचा अनुभव कामी आला आणि राज्यात शिवसेना - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख