नीलेश राणे यांनी शुद्धीत बोलावं..नाणार होणार नसल्याच्या भूमिकेवर शिवसेना ठाम  - Shiv Sena insists on the role of Nanar | Politics Marathi News - Sarkarnama

नीलेश राणे यांनी शुद्धीत बोलावं..नाणार होणार नसल्याच्या भूमिकेवर शिवसेना ठाम 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

माजी खासदार नीलेश राणे यांनी शुद्धीत बोलावं, कारण ते अनेकदा शुद्धीत बोलत नाही," असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.

मुंबई : "माजी खासदार नीलेश राणे यांनी शुद्धीत बोलावं, कारण ते अनेकदा शुद्धीत बोलत नाही," असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत नीलेश राणे यांनी शिवसेनेवर आरोप केले ते फेटाळत नाणार रिफायनरी होणार नसल्याची शिवसेनेची भूमिका ठाम आहे," असे राऊत म्हणाले.  
 
नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी चौदाशे एकर जमिनीचे व्यवहार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मावस भाऊ संचालक असलेल्या कंपनीमार्फत झाले आहेत, असा खळबळजनक आरोप नीलेश राणे यांनी काल पत्रकार परिषदेत केला. शिवसेनेने या प्रकल्पाला प्रथम विरोध केला. त्यांच्याच आशीर्वादाने नाणारमध्ये परप्रांतीयांनी जमीन खरेदी केली आणि आता शिवसेनाच रिफायनरी प्रकल्प आणेल, असा दावाही त्यांनी केला. 

ते म्हणाले, "नाणार प्रकल्पाचा अध्यादेश रद्द झाला. नाणार विषय संपला असे शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार सांगत आहेत. ही स्थानिकांची दिशाभूल असून रिफायनरी कंपनीकडून मुख्यमंत्री कार्यालयाबरोबर प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहेत. त्या रायगडसाठी नव्हे तर नाणारसाठीच आहेत. रिफायनरीसाठी सुगी डेव्हलपर्स नावाच्या कंपनीने परप्रांतीयांशी भागिदारी करत जागा खरेदी केली आहे.

या कंपनीचे संचालक मुख्यमंत्री ठाकरे यांचे मावस भाऊ निशांत देशमुख हे आहेत. 1400 एकर जमिनीचे खरेदी व्यवहार 17 विविध लोकांशी केले आहेत. कोरोनातील लॉकडाउनमुळे सध्या त्यांची कार्यालये बंद आहेत. मुख्यमंत्र्यांचे नातेवाईकच नाणार जमिनीच्या व्यवहारात असतील तर तो प्रकल्प बंद करण्याचे फक्‍त नाटक सुरू आहे. सुरवातीला विरोध दाखवायचा, लोकांना भडकावायचे आणि नंतर प्रकल्प आणायचे हा शिवसेनेचा जुनाच उद्योग आहे.

रिफायनरीसाठीच्या जमिनी परप्रांतीयांना देणाऱ्यांमध्ये शिवसेनेचेच पदाधिकारी सहभागी असल्याचा आरोप करून राणे म्हणाले, या प्रकल्पाला लागणारी 8 हजार हेक्‍टर जमीन शिवसैनिकांनी सहमतीपत्रे देऊन परप्रांतीयांच्या घशात घातली. पुण्याच्या एका कंपनीकडून अशाच प्रकारे 900 एकर जमीन परप्रांतीयांना दिल्या आहे. यामध्येही शिवसैनिकांनीच मदत केली होती. उपळे गावातील शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने पैसे कमवण्यासाठी जमिनीला स्वतःचे कुळ लावून घेण्यासाठी प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. रिफायनरी प्रकल्पाला अजून दोन हजार हेक्‍टर जागा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आता प्रकल्पाचे फक्‍त ऍग्रीमेंट करणे बाकी आहे. पराकोटीचा विरोध केल्यामुळे शिवसेना सरळ मार्गाने हा प्रकल्प आणू शकत नाही. त्यासाठी वेगळा फंडा राबवण्यात येत आहे. जे एन्‍रॉनचे झाले तेच रिफायनरीचे होईल. चर्चांची माहिती गल्लीतील शिवसेनेच्या खासदारांना कशी समजणार, असा टोलाही त्यांनी लगावला. 
  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख