रेमडेसिवीरअभावी चिता पेटल्या .. त्यावर भाजपनं राजकीय तवे शेकवू नयेत.. - Shiv Sena criticizes BJP over remedicivir injection Sanjay Raut | Politics Marathi News - Sarkarnama

रेमडेसिवीरअभावी चिता पेटल्या .. त्यावर भाजपनं राजकीय तवे शेकवू नयेत..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 19 एप्रिल 2021


“महाराष्ट्राने आर्थिक पुरवठा थांबवला तर दिल्लीच्या नाका-तोंडाला प्राणवायूच्या नळकांड्या लावाव्या लागतील”

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्र तुमच्या म्हणजे केंद्राच्या तिजोरीत सर्वाधिक पैसा ‘खणाखणा’ ओतत आहे. हा पुरवठा थांबला तर दिल्लीच्या नाका-तोंडाला प्राणवायूच्या नळकांडय़ा लावाव्या लागतील. महाराष्ट्राने देशातील लोकांच्या पोटापाण्याची व्यवस्था सदैव केली. आजही करत आहे, पण आज महाराष्ट्र संकटात असताना केंद्रातले मंत्री दिल्या-घेतल्याच्या हिशेबाच्या चोपडय़ा फडकवून महाराष्ट्राला त्रास देत आहेत, असा आरोप शिवसेनेने केला आहे.

'प्राणवायू' चे राजकारण झालेय तसे रेमडेसिवीरचेही सुरू आहे. महाराष्ट्र सरकारला हे इंजेक्शन हवे, ते त्यांना मिळत नाही, पण महाराष्ट्रातील भाजपचे उपरे पुढारी त्या औषध कंपन्यांकडून परस्पर रेमडेसिवीरचा साठा विकत घेतात, त्या कंपन्या हा साठा त्यांना परस्पर उपलब्ध करून देतात हा अपराधच आहे, पण ही साठेबाजी व काळाबाजारी कृत्ये पोलिसांनी उघड करताच भाजपचे लोक कढईतल्या गरम वडय़ासारखे उकळून फुटू लागले.

विधानसभा व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलेल्या एका फार्मा कंपनीच्या अधिकाऱ्याच्या सुटकेसाठी मध्यरात्रीच पोलीस ठाण्यावर धडकतात यास काय म्हणावे? महाराष्ट्रासह देशभरात प्राणवायूअभावी कोरोना रुग्णांचा प्राण गुदमरला आहे. रेमडेसिवीरअभावी चिता पेटल्या आहेत. त्या चितांवर कोणीच राजकीय तवे शेकवू नयेत. सरकार व विरोधकांनी निदान याप्रश्नी तरी एकमताने वागावे, असा सल्ला 'सामना'च्या अग्रलेखातून देण्यात आला आहे.

भाजपने हा रेमडेसिवीरचा साठा म्हणे विकत घेतला. मग हा साठा सरकारला का मिळू नये? केंद्राचा ‘चाप’ लागल्याशिवाय फार्मा कंपन्या हा अपराध करायला प्रवृत्त होणार नाहीत. विधानसभा व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलेल्या एका फार्मा कंपनीच्या अधिकाऱयाच्या सुटकेसाठी मध्यरात्रीच पोलीस ठाण्यावर धडकतात यास काय म्हणावे, असा सवाल अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे.

  1. देशभरातील 16 निर्यातदारांकडे 20 लाख रेमडेसिवीर इंजेक्शन पडून आहेत, पण महाराष्ट्राला गरज असताना ती विकण्यास कंपन्यांना परवानगी दिली जात नाही. 
  2. महाराष्ट्राला हे औषध दिलेत तर कंपन्यांवर कारवाई करू अशा धमक्या दिल्याचे श्री. मलिक यांचे वक्तव्य धक्कादायक तितकेच खळबळजनक आहे. 
  3. श्री. मलिक हे एक जबाबदार मंत्री आहेत व त्यांचे वक्तव्य म्हणजे हवेतील बाण नाहीत. 
  4. मलिक यांच्या वक्तव्यानंतर केंद्रातील व महाराष्ट्रातील भाजपची फौज ठाकरे सरकारविरोधात उतरून सरकारच कसे अपयशी वगैरे असल्याचे वक्तव्य करू लागली. 
  5. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी महाराष्ट्राची वकिली करण्याचे सोडून जावडेकरांप्रमाणे महाराष्ट्रविरोधी तुणतुणे वाजवायला सुरुवात केली. 
  6.  
     

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख