मोदी साहेब, हा देखील तिरंग्याचाच अपमान..शिवसेनेचे टीका - Shiv Sena criticism on Narendra Modi Tinraga Sanjay Raut | Politics Marathi News - Sarkarnama

मोदी साहेब, हा देखील तिरंग्याचाच अपमान..शिवसेनेचे टीका

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

चिनी सैन्याने आमची जमीन बळकावून तेथे त्यांचे लाल निशाण फडकवले हे कसे सहन करावे," असा सवाल 'सामना'च्या अग्रलेखात करण्यात आला आहे. 

मुंबई : "चिनी सैन्य आमच्या हद्दीत घुसून बसले हा देखील तिरंग्याचाच अपमान आहे साहेब! लाल किल्ल्यावर तिरंगा फडकतोच आहे. गाझीपूरच्या शेतकरी आंदोलनातील प्रत्येक तंबूवर आणि टॅक्टरवरही तिरंगाच फडकतो आहे, पण चिनी सैन्याने आमची जमीन बळकावून तेथे त्यांचे लाल निशाण फडकवले हे कसे सहन करावे," असा सवाल शिवसेनेचे मुख्यपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखात करण्यात आला आहे. 

अतिरेक्यांच्या गोळय़ांची, बॉम्बची पर्वा न करता श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकविणारे नरेंद्र मोदीच होते. तिरंग्याविषयीच्या त्यांच्या भावना ज्वलंत आहेत. त्यामुळे मोदी यांच्या भावना या महत्त्वाच्या आहेत. मूळ मुद्दा इतकाच की, लाल किल्ल्यावर तिरंग्याचा तथाकथित अपमान करणाऱयांचे धागेदोरे नक्की कोठपर्यंत पोहोचले आहेत ते समोर आणा. दुसरे असे की, न घडलेल्या अपमानावर काहूर माजवणे हासुद्धा तिरंग्याचा अपमान आहे. पण बोलायचे कोणी, असा प्रश्न अग्रलेखात विचारण्यात आला आहे.

 
"तिरंगा अपमानित करून कोणतेही आंदोलन चालणार नाही. प्रश्न इतकाच आहे, जो अपमान झालाय असे दिसत नाही त्यावर पंतप्रधानांनी इतके व्यथित का व्हावे किंवा सत्ताधारी पक्षाने इतकी आदळआपट का करावी ? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भावना देशाला समजल्या आहेत व आता आंदोलक शेतकऱयांचे म्हणणे ऐकून घ्या, इतकेच मागणे आहे. शेतकऱयांच्या मुळावर आलेले तीन कृषी कायदे रद्द करा व तिरंग्याचाच मान राखा असे सांगणे व त्यासाठी आंदोलन करणे हा गुन्हा नाही! हातात व ट्रक्टरवर तिरंगा लावूनच शेतकरी त्यांच्या प्रश्नांसाठी लढतो आहे. शेतकऱयांना रस्त्यावर तडफडून मरू देणे हा तर तिरंग्याचा भयंकर अपमान आहे, असे शिवसेनेचे अग्रलेखात म्हटलं आहे. 

 

प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर घडलेल्या प्रसंगाचा जो राजकीय धुरळा उडवला जात आहे, तो कितपत योग्य आहे ? साठ दिवसांपासून आंदोलन करणाऱया शेतकऱयांचा एक गट त्या दिवशी लाल किल्ल्यावर घुसला. त्यांनी हडकंप माजवला. त्यात तिरंग्याचा अपमान झाल्याचा प्रचार भाजप सायबर फौजांनी केला. तो अपप्रचारच ठरला. जे चित्रीकरण समोर आले त्यात तिरंग्याचा अपमान वगैरे झाल्याचे कुठेच दिसत नाही. तिरंगा लाल किल्ल्यावर डौलाने फडकतच होता, पण शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीच तिरंगा अपमानाचे कुभांड रचले हे उघड झाले. तिरंगा आम्हाला ‘जान से प्यारा’ आहे. भाजपच्या सायबर टोळधाडीस तिरंगा जितका प्यारा आहे त्यापेक्षा जास्त तो गाझीपूरच्या आंदोलक शेतकऱयांना प्यारा आहे, असे अग्रलेखात नमूद केले आहे. 

काय म्हटलं आहे अग्रलेखात..
चिनी सैन्य आमच्या हद्दीत घुसून बसले हा देखील तिरंग्याचाच अपमान आहे साहेब! लाल किल्ल्यावर तिरंगा फडकतोच आहे. गाझीपूरच्या शेतकरी आंदोलनातील प्रत्येक तंबूवर आणि टॅक्टरवरही तिरंगाच फडकतो आहे, पण चिनी सैन्याने आमची जमीन बळकावून तेथे त्यांचे लाल निशाण फडकवले हे कसे सहन करावे. श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकविण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी यांनी ‘भारत जोडो’ यात्रा काढली होती. त्याचे सारथ्य करणारे नरेंद्र मोदी आज देशाचे पंतप्रधान आहेत. अतिरेक्यांच्या गोळ्यांची, बॉम्बची पर्वा न करता श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकविणारे नरेंद्र मोदीच होते. तिरंग्याविषयीच्या त्यांच्या भावना ज्वलंत आहेत. त्यामुळे मोदी यांच्या भावना या महत्त्वाच्या आहेत. मूळ मुद्दा इतकाच की, लाल किल्ल्यावर तिरंग्याचा तथाकथित अपमान करणाऱ्यांचे धागेदोरे नक्की कोठपर्यंत पोहोचले आहेत ते समोर आणा. दुसरे असे की, न घडलेल्या अपमानावर काहूर माजवणे हासुद्धा तिरंग्याचा अपमान आहे. पण बोलायचे कोणी? 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख