मुंबई : ईडी विरोधात शिवसेना उतरणार रस्त्यावर आहे. येत्या ५ जानेवारीला शिवसैनिक मुंबईत दाखल होणार आहेत. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदरमधून शिवसैनिक दाखल होणार आहेत. शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईकांपाठोपाठ खासदार संजय राऊतांना ईडीची नोटीस आल्यानं शिवसेना आक्रमक झाली आहे. प्रताप सरनाईकांसह दोन्ही मुलांना तर संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आली आहे. सरकार पाडण्यासाठी सरकारचं षड्यंत्र असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे.
सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी प्रवीण राऊत यांच्याशी संबंधित 72 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. याच प्रकरणात शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. यावरुन सध्या मोठा गदारोळ सुरू आहे.
पीएमसी बॅंकेतील 4 हजार ३५५ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ‘एचडीआयएल’चे प्रवर्तक राकेश वाधवा, सारंग वाधवा, वारियम सिंग, जॉय थॉमस व इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. या गैरव्यवहारातील ९५ कोटी एचडीआयएलमार्फत प्रवीण राऊत यांनी इतर ठिकाणी वळविल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. या व्यवहाराची कोणतीही कागदपत्रे सादर केलेली नाहीत.
या पैशातून पालघर येथे जमीन घेण्यात आली होती. याशिवाय गैरव्यवहारानंतर एक कोटी ६० लाख प्रवीण राऊत यांनी त्यांची पत्नी माधुरी राऊत यांना दिले होते. त्यातील ५५ लाख रुपये बिनव्याजी कर्ज म्हणून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना देण्यात आले होते. त्या रकमेतून दादर पूर्व येथे घर खरेदी करण्यात आले होते. याशिवाय माधुरी राऊत व वर्षा राऊत या मे. अवनी कन्स्ट्रक्शन कंपनीत भागीदार असल्याचे ईडीने सांगितले आहे.
टॉप्स ग्रुपप्रकरणी तपास करणाऱ्या सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अमित चांदोळे यांना अटक केली होती. चांदोळे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय मानले जातात. लंडन येथील मालमत्तांप्रकरणी ईडीने चांदोळे यांची १२ तास चौकशी केल्यानंतर २५ नोव्हेंबरला मनी लॉंडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) कलम ३ व ४ अंतर्गत त्यांना अटक केली होती.
टॉप्स ग्रुपला मिळालेल्या एमएमआरडीएच्या कंत्राटात गैरव्यवहार करून त्यातील दरमहा सहा लाख रुपये त्यांना मिळत असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ईडीने मुंबई व ठाण्यातील १० ठिकाणी शोधमोहीम राबवली होती. त्यात चांदोळेच्या ठिकाणाचाही सहभाग होता.
Edited by : Mangesh Mahale