भाजपच्या आक्रमकपणाला उत्तर देण्यासाठी...कोकणात शिवसेना चार्ज - Shiv Sena active in Konkan .. Creating environment for elections | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपच्या आक्रमकपणाला उत्तर देण्यासाठी...कोकणात शिवसेना चार्ज

मुझफ्फर खान 
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

भाजपच्या आक्रमकपणाला उत्तर देण्यासाठी शिवसेना मैदानात उतरल्याचेही बोलले जात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर हातमिळवणी करून वर्षभरापूर्वी शिवसेनेने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. 

चिपळूण  : रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात शिवसेना अ‍ॅक्टिव्ह झाली आहे. मेळावे, बैठका, पक्षप्रवेश, रक्तदान शिबिर या माध्यमातून शिवसेनेने वातावरण निर्मिती सुरू केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला एकच उधाण आले आहे. आगामी पालिका, जिल्हापरिषद, ग्रामपंचयाती निवडणुकीसाठी ही वातावरण निर्मिती आहे. शिवाय भाजपच्या आक्रमकपणाला उत्तर देण्यासाठी शिवसेना मैदानात उतरल्याचेही बोलले जात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर हातमिळवणी करून वर्षभरापूर्वी शिवसेनेने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले. त्यांचा स्वभाव शांत आणि संयमी त्याच मुख्यमंत्री पदासारखी मोठी जबाबदारी त्यांच्यावर आल्याने ते आणखी संयमी आणि शांत झाले. कोरोनाचा शिरकाव महाराष्ट्रात झाला आणि मुख्यमंत्र्यांनी पूर्ण लक्ष त्यामध्ये घातले. साहजिकच पक्ष संघटनेकडे लक्ष देण्यास त्यांना पुरेसा वेळ मिळालाच नाही. 
परंतु दसरा मेळाव्याला ठाकरेंनी तडाखेबंद भाषण करून शिवसेनेमधील मरगळ काहीशी झटकली. पाठोपाठ शिवसेना जिल्हाप्रमुख, नेते आणि आमदार यांच्या बैठका घेऊन एका बाजूला विकास कामांचा आढावा तर दुसर्‍या बाजूला महाराष्ट्रावर भगवा फडकवण्यासाठी सज्ज राहा असे आदेश त्यांनी शिवसैनिकांना दिले. 

अचानकपणे शिवसेनेत मोठे बदल जाणवू लागले. अगदी जिल्हापातळीपासून ते गाव पातळीपर्यंत शिवसैनिक कमालीचे ऍक्टिव्ह झाल्याचे चित्र काही दिवसातच दिसू लागले. त्यामुळे कोकणातील शिवसेनेच्या प्रत्येक आमदाराने आपल्या मतदारसंघात मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. युवा सेनेचे वरिष्ठ पदाधिकारी देखील जिल्हा पातळीवर सक्रिय झाले आहेत. कोणतीही निवडणूक नसताना पक्षप्रवेशाचे कार्यक्रम घेतले जात आहेत. जिल्हापरिषद गटात बैठका, भेटीगाठी असे कार्यक्रम देखील सुरू करण्यात आले आहेत. 

स्थानिक पातळीवरील अनेक समस्या बाबत देखील शिवसैनिक आवाज उठवू लागले आहेत.शिवसेनेवर टीका करण्याची आणि कोंडीत पकडण्याची एक ही संधी भाजप पदाधिकारी सोडत नाहीत. भाजप पदाधिकार्‍यांनी देखील तालुकानिहाय दौरे आयोजित करून भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या नाराज आणि संघटनेपासून लांब असलेल्या पदाधिकार्‍यांच्या मुद्दामहून भेटीगाठी घेण्याचे सत्र भाजप नेत्यांनी सुरू केले आहे. भाजपच्या याच खेळीला उत्तर देण्यासाठी शिवसेना अचानक अ‍ॅक्टिव्ह झाली असल्याची चर्चा देखील ऐकण्यास मिळत आहे.  

शिवसेनेच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेचे गुर्‍हाळ सुरू झाले आहे. अचानकपणे शिवसेनेत निर्माण झालेला हा उत्साह, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सक्रिय झालेले शिवसैनिक पाहता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. स्वबळावर भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा हे उद्धव ठाकरेंचे विधान केंद्रस्थानी धरून चर्चा रंगत आहे.

 
कोकणातील घराघरात शिवसेना रूजलेली आहे. कोरोनानंतर हळू हळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. विकास कामे केली जात आहेत. कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठीच आम्ही पक्षाचे उपक्रम हाती घेतले आहेत. नव्या पिढीला विधायक राजकारणात आणण्याचे काम आम्ही करत आहोत. 

योगेश कदम, आमदार दापोली

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख