शरद पवार शेताच्या बांधावर..मुख्यमंत्री दूरचित्रवाणीवर...? - Sharad Pawar will visit the farmers, Uddhav Thackeray will sit at home and instruct the farmers | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवार शेताच्या बांधावर..मुख्यमंत्री दूरचित्रवाणीवर...?

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

शरद पवार नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसूनच अधिकाऱ्यांच्या आढावा बैठक घेण्यात मग्न आहेत.

पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात पावसामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसामुळे हातचे पीक गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्याला दिलासा देण्याची मागणी विरोधक वारंवार करत असून विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मात्र अजूनही घरात बसूनच अधिकाऱ्यांच्या आढावा बैठक घेण्यात मग्न आहेत. शरद पवार दोन दिवसांच्या मराठवाड्याचा दौऱ्यावर असणार आहेत. ता. १८ आणि १९ ऑक्टोबर असा दोन दिवस हा दौरा असणार आहे. तुळजापूर, उमरगा, औसा, परांडा, उस्मानाबाद येथे शरद पवार भेट देणार असून पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत.

आंध्र ओडिशा आणि तेलंगणा राज्याला अशाच अतिवृष्टीचा आणि पुराचा फटका बसला आहे. तेथील मुख्यमंत्र्यांनी विविध ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहण्या केल्या असून हवाई दौरेही काढले आहे. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र अजूनही घराबाहेर पडलेले नाहीत, असे तरी सध्याचे चित्र आहे.  

राज्याच्या काही भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पुढील चार दिवसात पुन्हा पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान विभागाने दिल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून पुणे, कोकण, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्त तसेच या विभागातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून पूरस्थितीचा आढावा घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर शरद पवार हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची विचारपूस करणार आहेत, तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसून दूरचित्रवाणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सूचना देत आहेत. या दोन्ही घटनेबाबत राजकीय क्षेत्रात चर्चा रंगल्या आहेत. मुख्यमंत्री ठाकरे हे घरात बसून बैठका घेतात या विषयावरून माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि नितेश राणे काही दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. 

राज्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार हे शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जाणार आहेत, तर दुसरीकडे मुख्यमंत्री हे फक्त दुरचित्रवाणीवरून शेतकऱ्यांना दिलासा देणार की नुकसानग्रस्त भागाचा दैारा करणार हे लवकरच समजेल.

Edited  by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख