मुंडेबाबत शरद पवार योग्य तो निर्णय घेतील...  - Sharad Pawar will make the right decision about Munde Sanjay Raut | Politics Marathi News - Sarkarnama

मुंडेबाबत शरद पवार योग्य तो निर्णय घेतील... 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 14 जानेवारी 2021

धनंजय मुंडे यांचा हा व्यक्तिगत प्रश्न आहे. हा राजकारणाचा मुद्द्या होऊ शकत नाही.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात एका तरूणीने  बलात्काराची तक्रार पोलिसांकडे केली आहे. यावर धनंजय मुंडे यांनी खुलासा केला आहे. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

संजय राऊत म्हणाले, ''धनंजय मुंडे यांचा हा व्यक्तिगत प्रश्न आहे. हा राजकारणाचा मुद्द्या होऊ शकत नाही. मुंडेबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार योग्य निर्णय घेतील. या प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत येईल हा भ्रम आहे.'' दिल्ली येथील आंदोलनाबाबत राऊत म्हणाले की केंद्र सरकारने न्याय दिला पाहिजे. कृषी कायदे मागे घेतल्यास सरकारची प्रतिमा उजळेल.

मुंडे यांच्याविरोधात पोलिसांकडे एका तरुणीने बलात्काराची तक्रार दिली आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात ही तक्रार देण्यात आली आहे. तिने तिच्या जिवाला धोका असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदार तरुणीची पोलिसांनी दखल न घेतल्याने तिने ट्विट करीत हा प्रकार मांडला आहे. या ट्विटमध्ये तिने मुंबईचे पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टॅग केले आहे. ही तक्रार 10 जानेवारीला देण्यात आली होती. ती 11 जानेवारीला मुंबई पोलिसांकडून स्वीकारण्यात आली आहे. या तरुणीने पंतप्रधान मोदींना ट्विट करीतही न्याय मागितला आहे. 

तक्रारीवर पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. या सर्व प्रकरणात आता पोलिस गुन्हा दाखल करणार का, मुंडेची आमदारकी रद्द होऊ शकते का, असे प्रश्न विचारले जात आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला नाही तर पोलिसांच्या अंगलट हे प्रकरण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

फौजदारी कायद्यात २ एप्रिल २०१३ रोजी दुरुस्ती होऊन नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या कलम १६६-अ अन्वये दखलपात्र गुन्ह्याविषयी एफआयआर नोंदवून घेतला नाही, तर संबंधित सरकारी कर्मचाऱ्याला सहा महिने ते दोन वर्षांपर्यंतचा कारावास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तरीही, धनंजय मुंडे यांच्याविरुद्धच्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीवर ओशिवरा पोलिस एफआयआर नोंदवून घेत नसल्याचा आक्षेप तक्रारदार महिलेचे वकील अॅड. रमेश त्रिपाठी यांनी घेतला आहे. 

 Edited  by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख