शरद पवार या कारणामुळे राज्यसभेत उपस्थित नव्हते  - Sharad Pawar was not present in the Rajya Sabha for this reason | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवार या कारणामुळे राज्यसभेत उपस्थित नव्हते 

सरकारनामा ब्यूरो 
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

कृषी विधेयकावरून आम्ही केंद्र सरकारचे समर्थन केले नाही. राज्यसभेत माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाची भूमिका मांडली आहे.

मुंबई : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या तात्पुरत्या स्थगितीमुळे राज्यातील मराठा समाजात विशेषतः तरुणांमध्ये अस्वस्थता होती. त्यामुळे राज्य सरकारने हे अपिल लवकर करावे, अशी आम्हा सर्वांची भूमिका होती. ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्य करून तसा विनंती अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे.

मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकांमुळे मला दिल्लीला जाता आलं नाही आणि राज्यसभेच्या कामकाजात सहभागी होता आलं नाही, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले. 

कृषी विधेयक राज्यसभेत मांडले, त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसने सभात्याग करून भारतीय जनता पक्षाला सोयीची भूमिका घेतली, अशी चर्चा राज्यात सुरू आहे. मुंबईत आज (ता. 22 सप्टेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलच शरद पवार यांनी त्यावर स्पष्टीकरण देत त्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. 

कृषी विधेयकावरून आम्ही केंद्र सरकारचे समर्थन केले नाही. राज्यसभेत माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाची भूमिका मांडली आहे. तसेच, खासदार वंदना चव्हाण, फौजिया खान याही बोलल्या आहेत, असे पवार यांनी या वेळी सांगितले. 

राज्यसभेतील आपल्या गैरहजेरीबद्दल पवार यांनी सांगितले की, मला दिल्लीला जाता आलं नाही, त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठविण्यासाठी तातडीने अपिल करण्याची गरज होती. त्या संदर्भात गेल्या दोन दिवसांत मी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अन्य मंत्री, तसेच कायदे तज्ज्ञांशी विचारविनयम केला. त्यानुसार राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयास विनंती अर्ज केला आहे. या सर्व कामासाठीच मला दोन दिवस मुंबईत थांबावे लागले. 

राज्यसभेत सादर करण्यात आलेल्या दोन ते तीन कृषी विधेयकांवर दोन ते तीन दिवस चर्चा चालेल अशी अपेक्षा होती. मात्र, ही बिले तातडीने मंजूर करावीत, असा आग्रह सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा होता, असे दिसून आले. या बिलाच्या संदर्भात सदस्यांना काही प्रश्‍न, शंका, मते व्यक्त करायची होती. मात्र सदस्यांचा आग्रह बाजूला ठेवून कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न असावा, असे दिसत होते.

त्या वेळी काही सदस्य हे नियमाविरोधात आहे, हे राज्यसभेच्या उपाध्यक्षांना सांगत होते. मात्र, असे असतानासुद्धा सदस्यांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी वेलमध्ये धाव घेतली, असे शरद पवार यांनी सांगितले. उपाध्यक्षांनी सदस्य सांगत असलेले नियम ऐकून घेण्याची गरज होती, असेही ते म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख