शरद पवारांनी चंद्रकांतदादांचे कपडे `काढले` - sharad pawar taunts chandrakant patil in one finr morning | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवारांनी चंद्रकांतदादांचे कपडे `काढले`

अनिल सावळे
शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020

चंद्रकांतदादांच्या `वन फाईन माॅर्निंगवर` तिरकस टिप्पणी!

पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे टोमणे मारण्यात माहीर समजले जातात. विरोधकांविषयी असे एखादे वाक्य उच्चारतात की तो शब्दशः घायाळ होऊन जातो. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शरद पवार यांच्यातील कलगीतुरा हा नेहमीच रंगत असतो. पाटीलही पवारांवर टीका करताना मागेपुढे पाहत नाहीत आणि पवारही त्याचे परतफेड केल्याशिवाय राहत नाही. त्याचाच प्रत्यय पवार यांच्या पुण्यातील दौऱ्यात आला. 

खासदार छत्रपत उदयनराजे आणि छत्रपती संभाजीराजे हे दोघेही भाजपच्या कोट्यातून संसदेत असल्याने त्यांनी आता केंद्र सरकारच्या मदतीने मराठा आरक्षणासाठी सूचना पवार यांनी केली होती. या विधानावर पाटील यांनी पवारांचे हे विधान अज्ञानातून आहे की मुद्दाम आहे, हेच कळत नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. तसेच राज्यात वन फाईन माॅर्निंग महाविकास आघाडीचे सरकार कोसळून राज्यात पुन्हा मध्यावधी निवडणूक होईल, असेही भाकीत केले होते.

त्यावर शरद पवार यांना पुण्यात विचारले असता त्यांनीही तिरकसपणे टिप्पणी केली.  "असे काहीतरी घडेल या आशेवर त्यांनी साडेचार वर्षे काढावीत. म्हणजे ते आणखी साडेचार वर्षे घरीच राहतील. ते रात्री झोपताना पहाटे काही झाले तर सकाळी निघावे लागेल, या आशेने कपडे घालून बसले आहेत, असा टोमणा मारला. 

पुण्यात पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी यांनी मराठा आरक्षणाविषयी सविस्तर भूमिका मांडली. मराठा आरक्षणाला राज्य सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे. परंतु हा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे केंद्र सरकारची भूमिका महत्त्वाची आहे. असे असले तरी मराठा आरक्षणावरील स्थगिती उठावी याबाबत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आग्रही भूमिका मांडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीही तीच  भूमिका आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

आरक्षणाबाबत राज्य सरकारने अध्यादेश काढावा असे पवार यांनी आधी म्हटले होते. या संदर्भात पवार म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे मंत्री असताना राज्य सरकारने आरक्षण देण्याबाबत एकमताने ठराव पारित केला होता. या ठरावाला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता. याबाबत कदाचित पाटील यांना विस्मरण झाले असावे. मराठा आरक्षणाचा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळे महाराष्ट्र सरकारकडून अपेक्षा करणे योग्य नाही. केंद्र सरकारने त्यांच्या विधी तज्ज्ञांची मदत घेण्याची आवश्यकता आहे. मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारने प्रयत्न करावेत हे मी विचारपूर्वकच बोललो आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवावी यासाठी याबाबत महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच याचिका दाखल केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांनी याबाबत चर्चा केली आहे. महाराष्ट्र सरकार आरक्षणाबाबत आग्रही भूमिका घेणार आहे.

पार्थच्या त्या ट्विटबद्दल पवार काय म्हणाले?

पार्थ पवार यांनी ट्विट करून मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. याबाबत पवार म्हणाले, मराठा समाजातील तरुणांमध्ये अस्वस्थता आहे. परंतु आत्महत्या करणे हा मार्ग नाही ही बाब तरुण पिढीने समजून घ्यावी. राज्य सरकार शंभर टक्के आरक्षणाच्या बाजूने उभे आहे. मी स्वतः निष्णात कायदेतज्ज्ञ कपिल सिब्बल यांचीही चर्चा केली आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण योग्य पद्धतीने मांडले जावे. त्यामुळे तरुणांच्या मनातील अस्वस्थता कमी होईल. सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आणखी काहीजणांनी याचिका दाखल केली आणि कोणाच्याही प्रयत्नाने झाले तर आरक्षण मिळणे हे महत्त्वाचे आहे.

 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ पवारांच्या ट्विट बाबत 'पार्थ यांचे ते वैयक्तिक मत आहे' असे सांगितले होते. याबाबत विचारले असता पवार म्हणाले, ते मला माहित नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेत पाठिंबा दिला होता. हीच भूमिका सर्वोच्च न्यायालयातही राहील.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख