पंढरपूर : शेतकऱ्यांच्या कष्टातून उभारलेली पंढरपूर तालुक्यातील साखर कारखानदारी आज संकटात आहे. त्यामध्ये 'विठ्ठला'ची आर्थिक स्थिती चिंताजनक आहे. ती सुधारण्यासाठी सर्व जुन्या संवगड्या सोबत घेवून यापुढच्या काळात प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी येथील शेतकऱ्यांनी साथ द्यावी असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आज केले.
दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कुटुंबियांची आज सरकोली येथे भेट घेतली. त्यानंतर झालेल्या श्रध्दांजली कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी विठ्ठल कारखान्याच्या आर्थिक स्थितीबद्दल सूचक वक्तव्य केल्याने स्थानिक राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. आमदार भारत भालके यांनी मंगळवेढा तालुक्यातील पाणी प्रश्न आणि साखर कारखान्याच्या प्रश्ना संबंधीत केलेल्या कामाच्या अनेक आठवणी पवार यांनी सांगितल्या.
पवार म्हणाले, "आमदार भालके यांनी गेल्या अनेक वर्षाच्या काळात शेतकरी सभासद आणि सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक केली. पंढरपूरच्या विकासाचा त्यांनी ध्यास घेतला. याच ध्यासाने त्यांची प्रकृती नाजूक झाली होती. थोड्या दिवसांनी मी परत येणार आहे. पंढरपूरच्या साखर कारखान्याचे अर्थकारण बिघडले आहे. त्याच्यावर सगळयांना सोबत घेवून विचार विनिमय करावा लागणार आहे.शेतकऱ्यांच्या ऊसाचे गाळप पूर्ण करण्याच्या दृष्टीने यापुढे प्रयत्न करावे लागतील."
महाराष्ट्रात पोरखेळ चाललाय : देवेंद्र फडणवीस https://t.co/34FcARy4Kz
— Sarkarnama (@SarkarnamaNews) December 18, 2020
"माझे भालके कुटुंबावर यापुढे कायम लक्ष आहे. कोणीही काळजी करू नये. आपला प्रपंच आणि संसार नीट चालावा," अशी अपेक्षा असते. अर्थकारण बिघडुन केलेल्या राजकारणात माझ्या सारख्याला फार रस नसल्याचे पवार यांनी सांगितले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी भालके यांचे पुत्र भगिरथ भालके यांना उमेदवारी द्यावी, अशीही मागणी केली. दरम्यान शरद पवार यांनी याबाबतचा सस्पेन्स कायम ठेवल्याने पंढरपूरचा राष्ट्रवादीचा उमेदवार कोण याविषयी चर्चा सुरू झाली आहे. यावेळी पालक मंत्री दत्ता भरणे, माजी आमदार दीपक साळुंखे, कल्याणराव काळे, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे, आमदार संजय शिंदे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील आदी उपस्थित होते.
भारत भालके साध्या पण तितक्याच आकर्षक पेहरावामुळे ते नेहमीच लक्षात राहतात. ते अत्यंत साधे होते. पण जनतेच्या प्रश्नांवर सभागृहात ते आक्रमक होत. साखर कारखान्यांचे हमी भावाचे प्रश्न आणि पाण्याचे प्रश्न ते नेहमीच सभागृहात मांडत. हृदयविकाराचा आणि किडणीचा त्रास असतानाही आपल्या दुखण्यावर मात करून ते सभागृहात येत असत. सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये ते निवडून आले होते.
(Edited by : Mangesh Mahale)

