शिवसेनेसारखा विश्वासू पक्ष नाही, असे म्हणताना पवारांनी सांगितला 1977 चा अनुभव - Sharad Pawar said Shiv Sena is a Faithful party  | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेसारखा विश्वासू पक्ष नाही, असे म्हणताना पवारांनी सांगितला 1977 चा अनुभव

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 10 जून 2021

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर किती दिवस टिकणार अशी चर्चा सुरु होती, मात्र, हे सरकार पाच वर्ष टिकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ncp) २२ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  (Sharad Pawar) यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकेल असे म्हणत शिवसेना हा विश्वासू पक्ष असल्याचे सांगितले. यासाठी त्यांनी शिवसेनेने इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांना दिलेल्या पाठिंब्याचा संदर्भ दिला. (Sharad Pawar said Shiv Sena is a Faithful party)

हे ही वाचा : जितिन प्रसाद यांच्यावर मोठी जबाबदारी; योगींनी दिले संकेत

पवार म्हणाले, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर किती दिवस टिकणार अशी चर्चा सुरु होती, मात्र, हे सरकार पाच वर्ष टिकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या देशामद्ये अनेकांनी अनेक पक्ष काढले, १९७७ मध्ये या देशात मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वात सरकार आले पण ते दीड ते दोन वर्षा पेक्षा जास्त काळ टिकले नाही. काही लोक गेले पण त्यामुळे नवीन लोक, नवीन नेतृत्व पक्षात तयार झाले. राष्ट्रवादी २२ वर्ष टिकली. दिवसेन दिवस जनतेचा विश्वास वाढत आहे. अनेक जण पक्ष सोडून गेले पण पक्षामध्ये नवीन नेतृत्व तयार होत असल्याचे पवार यांनी सांगितले.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी  (Narendra Modi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (ता.८ जून) स्वतंत्र बैठक झाली आणि चर्चा केली, त्यावरुन लगेच वेगवेगळ्या शंका घेण्यात आल्या, असे सांगत पवारांनी टीकाकारांना उत्तर दिले. ''शिवसेनेसोबत आपण याआधी कधी काम केले नाही. मात्र, महाराष्ट्र शिवसेनेलासुद्धा कित्येक वर्षांपासून पाहत आहे. माझा यासंबंधीचा अनुभव विश्वास असणाराच आहे. ज्यावेळी जनता पक्षाचे सरकार आले त्यानंतरच्या कालखंडात निवडणुकीत सगळीकडे काँग्रेसचा पराभव झाला मात्र, काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एक राजकीय पक्ष पुढे आला….तो म्हणजे शिवसेना. नुसते पुढे आले नाहीत तर या निवडणुकीत इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी शिवसेना विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा करणार नाही असा निर्णय घेतला. पक्षाचा नेता असा निर्णय घेतो पण त्याची चिंता कधी बाळासाहेबांनी केली नाही. त्यांनी इंदिरा गांधींना दिलेला शब्द निवडणूक न लढवता पाळला, असे पवारांनी सांगितले. 

हे ही वाचा :  केंद्रीय कृषिमंत्री शेतकऱ्यांशी चर्चेस तयार पण एका अटीवर...

त्यामुळे कोणी काहीही शंका घेतली तरी शिवेसनेने १९७७ मध्ये भक्कमपणाची भूमिका घेतली तीच भूमिका सोडण्यासंबंधी कोणी सांगत असेल तर तसे होणार नाही, असे शरद पवार म्हणाले. हे सरकार टीकेल आणि पाच वर्ष काम करेल. नुसतेच काम करणार नाही तर लोकसभा आणि विधानसभेत एकत्रित काम करुन सामान्य जनतेचे देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करण्याचे काम करेल याबाबत शंका नसल्याचे पवार म्हणाले.  

Edited By - Amol Jaybhaye  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख