कोथळा काढण्याच्या भाषेवरून शरद पवारांचे संजय राऊतांना चिमटे 

सदनाचे काम झाल्यावर आत झालेला संघर्ष विसरून सर्व एकत्र बसायचे व राज्याच्या हिताच्या गोष्टींवर चर्चा करायचे.
 Sharad Pawar,Sanjay Raut .jpg
Sharad Pawar,Sanjay Raut .jpg

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते आज (ता. १८ सप्टेंबर) मृणालताई गोरे दालनाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगमंत्री सुभाष देसाई व अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांची उपस्थिती होती. केशव गोरे स्मारक ट्रस्टच्यावीतने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कोणी कोथळा काढायची भाषा केली नव्हती. आजकाल अशा अनेक वेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात, असा चिमटा पवार यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Rauts) यांना काढला. (Sharad Pawar said on Sanjay Rauts statement)   

जुन्नर येथील एका कार्यक्रमात, आम्ही पाठीत खंजीर खुपसत नाही. तर कोथळा बाहेर काढतो. असे वक्तव्य राऊत यांनी केले होते. त्यावरुन पवार यांनी राऊतांना चिमटा काढला. या कार्यक्रमात बोलताना पवार यांनी मृणालताई गोरे यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात अनेकांनी योगदान दिले. त्या अनेकांपैकी काहींची आठवण प्रकर्षाने आपल्या सगळ्यांना होते, त्यात मृणालताईंचे नाव आल्याशिवाय राहत नाही. असे  पवार म्हणाले.   

पवार म्हणाले, ''विधिमंडळात मी मुख्यमंत्री झालो, त्याआधीच्या काळात मृणालताई या विरोधी पक्षनेत्या होत्या. अनेक प्रश्नांवर त्या कडाडून हल्ला करायच्या. मात्र त्यावेळी वेगळी परिस्थिती होती. सदनात अनेक वादविवाद होत असत. मात्र सदनाचे काम झाल्यावर आत झालेला संघर्ष विसरून सर्व एकत्र बसायचे व राज्याच्या हिताच्या गोष्टींवर चर्चा करायचे. तिथे सुसंवाद असायचा. हा सभ्यपणा त्याकाळात पाहायला मिळायचा. त्यावेळी कोणी कोथळा काढायची भाषा केली नव्हती. आजकाल अशा अनेक वेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात''.

''देशाच्या लोकसभेत जेव्हा मृणालताई गेल्या तिथेही आपले अस्तित्व फार थोड्या कालावधीत त्यांनी दाखवून दिले. दुर्दैवाने तो कालखंड जास्त काळ टिकला नाही. असे असतानाही आपले काम अखंडपणाने चालू ठेवले. त्यामुळे साहजिकच हा एक आदर्श त्या काळातील पदवीधर लोकांमध्ये होता. यातूनच एक नवी पिढी तयार झालेली आम्ही पाहिली आहे. अशा अनेक कर्तृत्वसंपन्न लोकांची पिढी तयार करण्याच्या कामाकडे त्यांनी पुढील काळात लक्ष केंद्रीत केले.'' असेही पवार म्हणाले. 

''मला अतिशय समाधान आहे, आपण सगळ्यांनी मृणालताईंचा एका वेगळ्या पद्धतीच्या स्मारकाचा विचार केला. त्यांच्या सबंध जीवनाचे दर्शन या फोटोंच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पण हे दर्शन केवळ त्यांच्यापुरते नाही तर महाराष्ट्रातील चळवळ, त्यातील समाजकारण, राजकारण, महाराष्ट्रातील बदलते चित्र या सगळ्याबद्दल एक सिंहावलोकन करण्याची संधी या दालनाच्या माध्यमातून आपल्याला मिळाली आहे. या सगळ्या व्यक्तिमत्वांचा आदर्श नव्या पिढीसमोर येण्याची अत्यंत गरज आहे. यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळाले याची खात्री आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com