शरद पवार म्हणाले, "पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटून कर्ज काढण्यासाठी आग्रह धरणार.." - Sharad Pawar said I will meet the Chief Minister to help the flood victims and insist on getting a loan | Politics Marathi News - Sarkarnama

शरद पवार म्हणाले, "पुरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटून कर्ज काढण्यासाठी आग्रह धरणार.."

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

"पुरग्रस्तांच्या मदतीसाठी कर्ज काढल्याशिवाय पर्याय नाही..मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून कर्ज काढण्यासाठी आग्रह धरणार,"

तुळजापूर : "पुरग्रस्तांच्या मदतीसाठी कर्ज काढल्याशिवाय पर्याय नाही..मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून कर्ज काढण्यासाठी आग्रह धरणार," असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. पुरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शरद पवार हे सध्या तुळजापूर परिसरात आहे. शेतकऱ्यांच्या भेटीनंतर पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.

शरद पवार म्हणाले की महाराष्ट्रावर आलेले हे ऐतिहासिक संकट आहे. अतिवृष्टीचा फटका सर्वात जास्त उस्मानाबाद, लातूर, इंदापूर, सोलापूर परिसराला बसला आहे. काही जिल्ह्यात नुकसानीचे प्रमाण अधिक आहे. सोयाबीन पिकाचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. वाहून गेलेल्या पिकाबाबत आर्थिक तरतूद करावी लागणार आहे. पावसामुळे गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. 
 
अतिवृष्टीचा फटका ऊसालाही बसला आहे. बंद असलेली साखर कारखानदारी सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. या संकटाचं ओझं महाराष्ट्राला झेपेल का, असा प्रश्न उपस्थित करून पवार म्हणाले ती या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून राज्याला मदतीची अपेक्षा आहे, असे पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नुकसानीचा आढावा घेण्यासाठी दोन दिवस मराठवाडा दौऱ्यावर होते. तुळजापूर, उमरगा, औसा, परांडा, उस्मानाबाद येथे शरद पवार यांनी भेट देऊन पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली 
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात पावसामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसामुळे हातचे पीक गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्याला दिलासा देण्याची मागणी करत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.  

पाच- सहा दिवसापुर्वी जिल्ह्याच्या अनेक भागात अतिवृष्टीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकासह, अनेक घराची पडझड होऊन संसारोपयोगी साहित्याचेही नुकसान झाल्याचे चित्र आहे. नदी, ओढे बंधाऱ्या शेजारील जमीन पाण्याच्या प्रवाहाने वाहुन गेल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शरद पवारांनी याची दखल घेत रविवारी सकाळीच तुळजापूर तालुक्यातील अनेक गावांना भेटी देत पाहणी केली. संकट मोठे आहे, त्यावर एकजुटीने मात करू, पण धीर सोडू नका, असे आवाहन करत पवारांनी शेतकऱ्यांना राज्य व केंद्राच्या मदतीतून सर्वोत्तपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

शरप पवारांच्या दौऱ्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील २० रोजी (मंगळवारी) जिल्ह्यात येत आहेत. तुळजापुर तालुक्यातील अपसिंगा व काटगाव या दोन गावांना ते भेट देणार आहेत. सकाळी आठ वाजता मुंबईहून सोलापुर आणि तेथील दौरा संपल्यानंतर साडेनऊ वाजता ते तुळजापुरला निघणार आहेत. सव्वा दहा वाजता काटगाव (ता.तुळजापुर ) येथे येऊन तेथील अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घराची पाहणी व शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी ते करतील.

तसेच सव्वा अकरा वाजता अपसिंगा (ता.तुळजापुर) येथील पडझड झालेल्या घरासह शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी करुन मुख्यमंत्री ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या दोन गावाची परिस्थिती जाणुन घेतल्यानंतर तुळजापुर विश्रामगृह येथे अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली असून जिल्ह्यात झालेल्या एकुण परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत.

  Edited  by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख