`होय, शरद पवारांनी सीरममध्ये जाऊन लस टोचून घेतलीय...` - sharad pawar done vaccination for boosting immunity power in serum | Politics Marathi News - Sarkarnama

`होय, शरद पवारांनी सीरममध्ये जाऊन लस टोचून घेतलीय...`

अश्विनी जाधव
शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020

पवार यांनी आज सीरममध्ये जाऊन भेट दिली. 

पुणे : कोरोनावरील लस तयार करण्याचे काम करणाऱ्या सिरम इन्स्टि्टयूटमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज भेट दिली. या आधी पण त्यांनी सिरमला भेट दिली होती. त्यामुळे साहजिकच पत्रकारांनी याबाबत पवारांना प्रश्न विचारला. पवार कोरोनाच्या संकटात राज्यभर इतके फिरत आहेत. त्यासाठीचे ते नक्की कोणते औषध घेतात, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला होता. त्याचे उत्तर खुद्द पवारांनीच दिले.

पवार हे मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटमध्ये (व्हीएसआय) साखर उद्योगावरील बैठकीसाठी आले होते. तेथे त्यांना पत्रकारांशी संवाद साधला. व्हीएसआयमध्ये जाण्यापूर्वी ते तेथून जवळच असलेल्या सीरमलाही भेट दिली. 

ते म्हणाले की सीरममध्ये प्रतिकारशक्ती वाढविणारी लस बनविली जाते. मी घेतलेली लस कोरोनाची नाही तर प्रतिकारशक्ती वाढविणार आहे. ती लस आत्ताच घेऊन आलो आहे. (पत्रकारांत हशा!) तुम्ही लोक (पत्रकार) माझ्याबद्दल अनेक गोष्टी उठवत असता. त्यामुळे मी जिथे जाईल तिथे मी कोरोनावरची लस घेतली की काय, अशी चर्चा खासगीत करतात. लोकांना वाटते की सीरमचे प्रमुख पूनावाला हे पवारांचे वर्गमित्र आहेत. त्यामुळे त्यांनी ती लस घेतली असेल, पण मी आणि माझ्या स्टाफने घेतली लस ही करोनावरची नाही तर प्रतिकारशक्ती वाढवणारी आहे, असे त्यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशातील दुर्दैवी घटनेबद्दल बोलताना ते म्हणाले की तेथील सरकारने कायदा हातात घेतला असून टोकाची भूमिका घेतली. या कृतीतून कायद्याला कवडीची किंमत दिली नाही हे स्पष्ट होत असून राहुल गांधी तिथे भेटण्यास जातात पण त्यांना जाऊ दिले नाही. त्यांना जाऊ द्यायला हवे होते. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे शांततेच्या मार्गाने तिथे गेले होते. तसंच त्यांना पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घ्यायची होती. त्यांच्यासोबत जे काही घडलं तेही योग्य नाही.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार देखील कोर्टात गेले आहे. आणखी कुणी जात असेल तर दहा जणांनी जावे, असे पार्थ पवारांबद्दल विचारलेल्या  प्रश्नावर त्यांनी सांगितले. पार्थ यांनी आपण मराठा आरक्षणासाठी कोर्टात जाणार असल्याचे काल सांगितले होते. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठावावी हीच सरकारची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चंद्रकांत पाटील यांनी राज्यात मध्यावधी निवडणूका होणार असल्याचे भाकीत केले होते. त्यावर बोलताना पवार म्हणाले की माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. असं काही घडेल यावर त्यांनी साडेचार वर्ष काढावी, असा टोमणा मारला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख