राज्यपालांच्या पत्रातील भाषा धक्कादायक : पवारांनी मोदींकडे केली तक्रार - sharad pawar complaints PM Modi about governor Koshiyari | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यपालांच्या पत्रातील भाषा धक्कादायक : पवारांनी मोदींकडे केली तक्रार

मिलिंद संगई
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020

धर्मनिरपेक्ष या संकल्पनेला भारतीय राज्यघटनेमध्ये अनन्यसाधारण महत्व असताना राज्यपालांनी पत्रात त्याचा उल्लेख अशा रितीने करण्यावर पवार यांनी आक्षेप घेतला आहे. घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तींनी मुख्यमंत्र्यांसारख्या घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीला पत्र लिहीतांना शब्द व भाषेचा योग्य वापर करणे अपेक्षित असते, असेही पवार यांनी नमूद केले आहे.

बारामती : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मंदीरे खुली करण्याबाबत लिहीलेल्या पत्राबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र लिहून राज्यपालांच्या एकूणच कार्यपध्दतीबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. 

राज्यपालांना स्वत:ची स्वतंत्र मते असू शकतात, त्यांनी मुख्यमंत्र्यांना या भावना कळविल्या हेही प्रशंसनीय आहे, मात्र राज्यपालांनी या विषयासंदर्भात प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीतील शब्दरचना वाचून आपल्याला आश्चर्य वाटले आणि तितकाच धक्काही बसल्याचे पवारांनी पत्रात नमूद केले आहे.

राज्यात सिध्दीविनायक, पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी तसेच शिर्डीच्या साईबाबा मंदीरांसह अनेक मंदीरे व प्रार्थनास्थळे आहेत, ते सुरु करण्याची परवानगी दिल्यास लोकांमध्ये सुरक्षित अंतर राखणे अशक्य होईल, त्या पार्श्वभूमीवरच राज्यातील धार्मिक स्थळे सुरु करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोध दर्शविला आहे, याचाही उल्लेख पवार यांनी मोदींना लिहीलेल्या पत्रात आवर्जून केला आहे.

आपण हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आहात, आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर अयोध्येला भेट देऊन प्रभू श्रीरामांविषयीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, आषाढी एकादशीला आपण पंढरपूरला जाऊन विठ्ठलाची महापूजाही केली आहे, आता मंदीरे सुरु करताना तुम्ही अचानक धर्मनिरपेक्ष झाला आहात काय, असा सवाल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे करणे धक्कादायक असल्याचे पवार यांनी नमूद केले आहे. राज्यपालांची ही भाषा आपणही नक्की नोंद घ्याल, एखाद्या राजकीय व्यक्तीने लिहील्यासारखे हे पत्र राज्यपालांनी लिहीले आहे. धर्मनिरपेक्ष या संकल्पनेला भारतीय राज्यघटनेमध्ये अनन्यसाधारण महत्व असताना राज्यपालांनी पत्रात त्याचा उल्लेख अशा रितीने करण्यावर पवार यांनी आक्षेप घेतला आहे. घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तींनी मुख्यमंत्र्यांसारख्या घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीला पत्र लिहीतांना शब्द व भाषेचा योग्य वापर करणे अपेक्षित असते, असेही पवार यांनी नमूद केले आहे.

राज्यपालांच्या पत्राचा रोख विचारात घेता आता मुख्यमंत्र्यांनाही माध्यमे व समाजापुढेही आपली भूमिका मांडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि या मुद्यावर मी मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी असल्याचेही पवार म्हणतात. हा मुद्दा मी ना राज्यपालांशी चर्चा केला आहे ना मुख्यमंत्र्यांशी. पण माझ्या मनातील व्यथा आपल्यापर्यंत व समाजापर्यंत पोहोचावी असे मला वाटले असेही शेवटी पवार यांनी या पत्रात नमूद केले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख