जयंतरावांचा जळगाव दौरा रद्द : खुद्द शरद पवारच एकनाथ खडसेंबद्दल कार्यकर्त्यांशी बोलणार - sharad pawar calls meeting of party workers from Jalgoan | Politics Marathi News - Sarkarnama

जयंतरावांचा जळगाव दौरा रद्द : खुद्द शरद पवारच एकनाथ खडसेंबद्दल कार्यकर्त्यांशी बोलणार

कैलास शिंदे
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

राष्ट्रवादीच्या जळगाव जिल्ह्यातील नेत्यांना मुंबईत बुधवारी (ता. 23) बैठकीसाठी पाचारण करण्यात आले आहे. सकाळी अकरा वाजता पक्षाच्या कार्यालयात ही बैठक होणार आहे.

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील प्रश्नाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार उद्या (त.२३)मुंबईत जिल्ह्यातील नेत्यांची बैठक घेत आहेत. यात भाजप नेते एकनाथराव खडसे यांच्या प्रवेशाबाबत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रश्नाबाबत आढावा तसेच भाजप नेते एकनाथराव खडसे यांच्या पक्ष प्रवेशावर चर्चा करण्यासाठी पक्षाचे प्रदेाध्यक्ष जयंत पाटील उदया (ता. २३)जळगाव जिल्ह्यात येणार होते. मात्र त्यांचा दौरा रद्द झाला आहे. त्या ऐवजी पक्षाचे राष्ट्रीय अधयक्ष शरद पवार हेच मुंबईत बैठक घेणार आहेत. पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांना मुंबईत बैठकीसाठी पाचारण करण्यात आले आहे. सकाळी अकरा वाजता पक्षाच्या कार्यालयात ही बैठक होणार आहे. जिल्हयातील सिंचन प्रश्न, केळी पिकाच्या संदर्भातील पश्न, या विषयावरही चर्चा करण्यात येणार आहे.

या  वेळी एकनाथराव खडसे यांच्या पक्ष प्रवेशावर चर्चा होण्याची शक्यता आहे.  खडसे यांनी गेल्या आठवड्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ला केला होता. फडणवीस यांनी आपल्याला त्रास दिला, असा जाहीर आरोप त्यांनी केला होता. पक्षाने अन्याय केल्यामुळे त्यांनी पक्षात राहू नये असा सूरही त्यांच्या  कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. ते शिवसेनेत जाणार की  राष्ट्रवादीत जाणार याबाबत चर्चा सुरू झाली. शिवसेनेचे नेते व राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्यांना शिवसेनेत येण्याचे आवाहन केले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ही ते पक्षात आल्यास त्यांचे स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जळगाव जिल्ह्यात येवून आढावा घेणार होते. मात्र आता पक्षाचे नेते शरद  पवारच आढावा घेत असल्याने या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे लक्ष असणार आहे.

पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनीही यास दुजोरा दिला. जळगावमधील प्रश्नांसह खडले यांच्या पक्षप्रवेशाबाबत चर्चा होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख