`उद्धव ठाकरे व शरद पवार हे तर गोंधळलेल्या अर्जुनासारखे` - sharad pawar and uddhav thackrey are like puzzled Arjun says Bhide | Politics Marathi News - Sarkarnama

`उद्धव ठाकरे व शरद पवार हे तर गोंधळलेल्या अर्जुनासारखे`

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

शरद पवार वंदनीय असल्याचेही भिडे यांचे मत

सांगली : अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या श्रीरामाच्या मूर्तीला मिशी असावी, अशी मागणी करून शिवप्रतिष्ठाचे संभाजी भिडे यांनी पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. सांगलीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली. दुसरीकडे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिराच्या मुद्दयावरून केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता श्री. भिडे म्हणाले, ""दोघांचे विधान गोंधळलेल्या अर्जुनासारखे आहे. कोरोना आणि भूमिपूजन यांची सांगड घालणे योग्य नाही. पवारांनी यावर बोलणे योग्य नाही. पवार हे वंदनीय आहेत. त्यांनी निमंत्रण नसले तरी अयोध्येला जावे. राज्याचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी तेथे उपस्थित असणे आवश्‍यक आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या या संकटात राज्यात दौरा करून जनतेला धीर द्यावा, असे मत भिडे यांनी व्यक्त केले.

मिशीशिवाय मूर्ती उभारली गेल्यास मंदिर होऊनसुद्धा मंदिर न झाल्यासारखे माझ्यासारख्या भक्ताला वाटेल. तसेच घुसखोर व आक्रमकाविरूद्ध लढलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन 5 ऑगस्टला आवश्‍य करावे असे सांगितले आहे. भूमिपूजनासाठी राज्यातील गडावरील माती व पाणी अयोध्येला पाठवले आहे, असे त्यांनी सांगितले.

अखंड प्रयत्नानंतर 1992 मशिद पाडण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर  अयोध्येत मंदिर उभारले जात आहे. 5 ऑगस्ट रोजी साधूसंत, महंत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मंदिराचे भूमीपूजन होत आहे. हा देशाला स्फूर्ती व प्रेरणा देणारा प्रसंग आहे. दसरा-दिवाळीप्रमाणे हा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा झाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. श्रीरामाच्या मूर्तीला मिशा असाव्यात अशी मागणी त्यांनी मंदिर उभारणीतील प्रमुख गोविंदगिरी महाराज यांच्याकडे केली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख