पुणे : पाॅपस्टार रिहाना हिने नवी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट केल्यानंतर भारतातील सेलिब्रेटिंनी त्यावर भाष्य करत मोदी सरकारची पाठराखण केली. त्यावरून सोशल मिडियात दोन्ही बाजूंनी वाद सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील यात उडी घेतली आहे. त्यांनी यावरून क्रिकटपटू सचिन तेंडुलकरला आज सल्ला दिला.
रिहाना हिने शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत आपण बोलणार आहोत की नाही, असा सवाल विचारला होता. त्याला सचिनसह इतर नामवंतांनी आक्षेप घेत भारताच्या अंतर्गत प्रश्नांत नाक खूपसू देऊ नका आणि आपली एकता कायम ठेवा, अशा आशयाचे आवाहन केले होते. त्यावर शरद पवार यांनी पहिल्यांदाच मत व्यक्त केले.
`भारतातील सेलिब्रेटिंनी या आंदोलनाबाबत जी भूमिका घेतली आहे त्याबद्दल सामान्य लोकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपलं क्षेत्र सोडून इतर गोष्टी बोलताना काळजी, घ्यावी असा माझा सचिन तेंडुलकरला सल्ला राहील, अशा मोजक्या शब्दांत त्यांनी कानउघाडणी केली. शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर हे अयशस्वी ठरत असल्याचे अप्रत्यक्षरित्या सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, नितीन गडकरी यांसारख्या नेत्यांनी आंदोलकांबरोबर चर्चा केली, तर मार्ग निघेल. हे उच्चस्तरीय नेते संवाद साधणार असतील, तर आंदोलकांच्या नेत्यांनी देखील मार्ग काढण्यादृष्टीने या नेत्यांबरोबर चर्चा केली पाहिजे, असे पवार यांनी सुचविले.
पं. भीमसेन जोशी जन्मशताब्दी अभिवादन कार्यक्रमावेळी ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. शेतकरी आंदोलनाबाबत सरकारलाच पुढाकार घ्यावा लागेल, असे स्पष्ट करीत पवार म्हणाले ``आंदोलकांना रोखण्यासाठी सरकारने रस्त्यात खिळे ठोकले, अशी टोकाची भूमिका यापूर्वी कधीच घेतली गेली नाही. तरीही देशातील अन्नदाता थंडीचा विचार न करता आंदोलनासाठी रस्त्यावर बसतो, अशावेळा सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. या आंदोलनास आपल्या देशात सहानुभूती होतीच. आता परदेशातूनही त्याला सहानुभूती मिळू लागली आहे. केंद्र सरकारने याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. हे सगळं का घडलं तर पंतप्रधानांनी मागे अमेरिकेत असताना मोदी- ट्रंम्प अशा घोषणा केली. त्याचे स्वागत काही घटकांनी केले. आता तशाच प्रकारची प्रतिक्रीया आज परदेशात पहायला मिळत आहे.``
शेतकरी कायद्यांला विरोध आणि आंदोलन या प्रश्न तोडगा काढण्यासाठी तुम्ही स्वतः पुढाकार घेणार का, या प्रश्नावर, " मला पुढाकार घेण्याचे कारण नाही आणि या प्रश्नी मध्यस्थी करण्याची सूचना मला कुणीही केलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलनामध्ये खलिस्तानवादी वा अतिरेक्यांचा शिरकाव झाला, हा आरोप आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. देशाच्या अन्नदाता रस्त्यावर उतरतो, त्यावेळी त्याला अशाप्रकारे आरोप करून बदनाम करणे सुसंस्कृतपणाचे लक्षण नाही, असा टोलाही पवार यांनी लगावला.

