विधान परिषद निकालानंतर पवारांची पहिली प्रतिक्रिया... - Sharad Pawar  first reaction after the Legislative Council result | Politics Marathi News - Sarkarnama

विधान परिषद निकालानंतर पवारांची पहिली प्रतिक्रिया...

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

आता सर्वसामान्य लोकांनीही महाविकास आघाडी सरकारला स्वीकारलं आहे, महाराष्ट्रतील चित्र बदलते आहे.

पुणे : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीने यश मिळविले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले की  धुळे नंदुरबार मतदारसंघातील निर्णय हा आश्चर्यकारक नाही, त्याच्या हाती मोठा वर्ग होता. हा त्याचा विजय नव्हे. गेल्या वर्षभरात आम्ही काम करून दाखवलं, यामध्ये मुख्यतः नागरपूची जागा कधीच मिळाली नव्हती, ती जागा कॉग्रेसने जिंकली आहे. 

शरद पवार म्हणाले, "हा महाविकास आघाडीचा विजय आहे. महाविकास आघाडी सरकारने एकत्र काम केलं त्याचं हे यश आहे. पुणे मतदारसंघातही आम्हाला यश मिळवता आलं नव्हतं, मात्र आता सर्वसामान्य लोकांनीही महाविकास आघाडी सरकारला स्वीकारलं आहे, महाराष्ट्रतील चित्र बदलते आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांचा विनोदी विधान करण्याचा लौकिक आहे, मागच्या वेळेस विधानपरिषदेला चंद्रकांतदादा कसे निवडून आले. पुणे शहरातील त्याच्या सोयीचा मतदारसंघ त्यांनी निवडला."

 

वंजारींचा विजय दृष्टीक्षेपात, हवी ३८००मते…
 नागपूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी काल सकाळी ८ वाजता सुरू झाली. पहिल्या फेरीची मोजणी पूर्ण झाली असून आज पहाटे दुसऱ्या फेरीची मोजणी सुरू झाली आहे. दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मोजणीमध्येही कॉंग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी आघाडीवर आहेत. त्यांचा विजय दृष्टीक्षेपात आला असून विजयासाठी आता केवळ ३८०० मतांची आवश्‍यकता आहे. 

पहिल्या फेरीमध्ये अभिजित वंजारी यांना ५५९४७ मते मिळाली, तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संदीप जोशी यांना ४१५४० मते मिळाली. दुसऱ्या फेरीची मतमोजणी सध्या सुरू आहे. यामध्ये वंजारी यांनी १००० मतांची आघाडी घेतली असून त्यांना मिळालेली एकूण मते ५६९४७ झाली आहेत. तर संदीप जोशी यांना आतापर्यंत ४१६५२ मते मिळाली आहेत. ६०७४७ मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी वंजारींना आता केवळ ३८०० मतांची आवश्‍यकता आहे. त्यामुळे ते विजयाच्या अगदी समीप आले आहेत. 

अमरावतीत सरनाईकांची आघाडी कायम !
 अमरावती : अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी काल सकाळी आठ वाजता सुरू झाली. पहिल्या फेरीच्या मोजणीमध्ये अपक्ष उमेदवार अ‌ॅड. किरण सरनाईक यांनी घेतलेली आघाडी आज दुसऱ्या दिवशी सकाळी विसाव्या फेरीपर्यंत कायम आहे. विजयी होण्यासाठी १४,९१६ मतांचा कोटा ठरलेला आहे. मात्र, अद्याप अर्धेही मत न मिळाल्याने उमेदवारांची चिंता वाढली आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एक डिसेंबरला मतदान पार पडले. त्यानंतर सर्वांना निकालाची उत्सुकता लागली होती. काल सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली. पहिली फेरी पूर्ण झाली तेव्हा अपक्ष उमेदवार अ‌ॅड. किरण सरनाईक यांनी आघाडी घेतली होती. तर दुसऱ्या क्रमांकावर महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे होते. शेखर भोयर हे तिसऱ्या स्थानी होते.

अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी महाविकास आघाडी व भाजपला धक्का देत ६,५२८ मिळविली असली तरी विजयासाठी त्यांना एकूण १४,९१६ मते मिळवावी लागणार आहेत. विजयासाठी १४ हजार ९१६ मतांचा कोटा निर्धारित करण्यात आला. शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे ५,४४७ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. तर अपक्ष उमेदवार मनोहर भोयर हे ५२०५ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. सुरुवातीपासून तिघेही याच क्रमांकावर कायम आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख