Doctor`s Day : राजकारणात डाॅक्टरांचा डोस परिणामकारक; सात खासदार वैद्यकीय क्षेत्रातील

डाॅक्टर दिनानिमित्त राजकारणातील डाॅक्टरांचा घेतलेला हा आढावा.
MPs from medical field
MPs from medical field

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात डाॅक्टर असलेल्या अनेक व्यक्तींनी आपला ठसा उमटविला असून महाराष्ट्रातून लोकसभेत तब्बल सात डाॅक्टर खासदार आहेत.

डाॅक्टर दिनानिमित्त (एक जुलै) महाराष्ट्रातील डाॅक्टर असलेल्या पण राजकारणात यशस्वी झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वकिल असलेल्या नेत्यांची राजकारणात संख्या जास्त असली तर डाॅक्टरांचीही संख्या लक्षवेधक आहे.

माजी संरक्षण राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरे हे प्रसिद्ध आॅनकाॅलाॅजिस्ट आहेत.  प्रीतम मुंडे, भारती पवार आणि हिना गावित या तीन महिलांनीही वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. मुंडे आणि गावित यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. 2019 च्या निवडणुकीनंतर सुजय विखे आणि अमोल कोल्हे हे आणखी दोन डाॅक्टर लोकसभेत गेले. विखे हे न्यूरोसर्जन आहेत. ठाण्याचे खासदार श्रीकांत शिंदे हे तर एमएस (आर्थो) आहेत. नागपूरमधील प्रसिद्ध नेत्रतज्ञ विकास महात्मे हे भाजपकडून राज्यसभेत खासदार आहेत. 

डाॅक्टर असूनही राजकीय कारकिर्द गाजविलेले डाॅ. पद्मसिंह पाटील यांचेही नाव अनेकांना विसरणे शक्य नाही. राज्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत असलेल्या पाटील यांनी ऊर्जा, पाटबंधारे अशी खाते सांभाळली. पण डाॅक्टर असूनही त्यांना आरोग्य विभाग काही मिळाला नाही.

राज्याच्या विधानसभेत मात्र डाॅक्टरांची संख्या हाताच्या बोटावर आहे. यात विद्यमान मंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे हे बीएएमएस आहेत. माजी मंत्री संजय कुटे हे पण बीएएमएस आहेत. माजी मंत्री विजयकुमार गावित, चांदवडचे आमदार राहुल आहेर, अकोलेचे किरण लहामटे हे पण डाॅक्टर आहेत. विधान परिषदेत डाॅ. नीलम गोऱ्हे आणि सुधीर तांबे हे दोघे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहेत. 

राजकारणात येताना डाॅक्टरांना काही विशेष पथ्ये पाळावी लागतात का, याबाबत बोलताना माजी खासदार डाॅ. उल्हास पाटील म्हणाले की वैद्यकिय व्यवसायातील व्यक्ती राजकारणात असल्यास त्यांना समाजात अत्यंत संयम ठेवून वागावे लागते. प्रथम म्हणजे रूग्णांच्या भावनाचा फार जवळून विचारा करावा लागतो. राजकारणी म्हणून प्रत्येक ठिकाणी फिरावे लागते अशा वेळेस जर त्या रूग्णाला आपण व्यवस्थित ट्रीटमेंट दिली नसेल तर तो थेट समाजात सर्वासमोर आपल्याला बोलून आपला "भोंगा'वाजवतो. जर चांगले असेल तर वाहवा करतो. त्याच्या या प्रतिक्रियेवरच समाजात आपल्याबाबत एक संदेश जात असतो. त्यामुळे राजकारणी डॉक्‍टरांना समाजात फारच जबाबदारीने वागावे लागते.

भाजपच्या संघटनेत जळगाव जिल्हा भाजपचे अध्यक्ष म्हणून काम पाहणारे डॉ. राध्येश्‍याम चौधरी जळगाव येथील स्त्रीरोग तज्ञ आहेत. ते याबाबत म्हणाले की राजकारण आणि वैद्यकीय या दोन्ही क्षेत्रात भरपूर वेळ द्यावा लागतो. रूग्णांशी चोवीस तास संपर्क ठेवावा त्याच प्रमाणे राजकारणातही जनतेशी सतत संपर्क ठेवावा लागतो. राजकारणात डॉक्‍टर असल्याचा एक फायदा असा होतो, कि डॉक्‍टरांना दवाखान्यात बसल्यावरही जनतेशी संपर्क होतो, त्यामुळे संपर्कासाठी आम्हाला फिरावे लागतेच असे नाही. मात्र दोन्ही ठिकाणी काम करण्यात समाधान मिळते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com