Budget 2021 : बावीस वर्षानंतर पहिल्यांदा अर्थमंत्र्याला शेअर बाजाराची पाच टक्क्यांची सलामी - sensex roses by 5 percent on budget day after 22 years | Politics Marathi News - Sarkarnama

Budget 2021 : बावीस वर्षानंतर पहिल्यांदा अर्थमंत्र्याला शेअर बाजाराची पाच टक्क्यांची सलामी

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

‘कोरोना’शी झुंजणाऱ्या अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर करवाढ केली जाईल आणि त्यामुळे कंपन्यांचा नफा कमी होईल, अशी भीती बाजारात वर्तविली जात होती. ती फोल ठरली. 

मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे शेअर बाजाराला आज तेजीचा डोस मिळाला. उत्साही गुंतवणूकदारांनी आज बॅंका आणि वित्तीय संस्थांच्या शेअरची जोरदार खरेदी केली. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या ‘सेन्सेक्स’ने तब्बल २३१४ अंशांची हनुमान उडी मारली. दिवसअखेर तो ४८,६०० अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’देखील ६४६ अंशांनी वाढून १४,२८१ अंशांवर स्थिरावला. गेल्या 22 वर्षांत अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पहिल्यांदा शेअर बाजाराने अर्थमंत्र्यांना अशी सलामी दिली आहे. मुबई शेअर बाजार आज पाच टक्क्यांनी तर निफ्टी 4.7 टक्क्यांनी वाढला. 

यशवंत सिन्हा यांनी 1999 मध्ये मांडलेल्या अर्थसंकल्पानंतर सेन्सेक्स 5.7 टक्क्यांनी आणि त्या आधी पी. चिदंबरम यांनी 1997 मध्ये सादर केलेल्या ड्रीम बजेटनंतर 6.7 टक्क्यांनी सेन्सेक्स वधारला होता.  गेल्या वर्षी निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर बाजार 2.5 टक्क्यांनी गडगडला होता. 

‘कोरोना’शी झुंजणाऱ्या अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर करवाढ केली जाईल आणि त्यामुळे कंपन्यांचा नफा कमी होईल, अशी भीती बाजारात वर्तविली जात होती. त्यामुळे गेल्या सहा दिवसांत निर्देशांकांत घसरगुंडी झाली होती. ‘सेन्सेक्स’ तर ५० हजारांवरून ४६ हजार अंशांपर्यंत खाली आला होता; मात्र आज निर्देशांकाने त्यातील निम्मे नुकसान भरून काढले. मुख्यतः संपत्ती कर; तसेच शेअर गुंतवणुकीवरील दीर्घकालीन भांडवली लाभ करात वाढ न झाल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पी भाषणास सुरवात केल्यावर ‘सेन्सेक्स’ वर-खाली होत होता; मात्र त्यांचे भाषण संपत आल्यावर बहुसंख्य तरतुदी स्पष्ट झाल्याने ‘सेन्सेक्स’ने जोरदार उसळी घेतली. आज मुख्यतः बॅंका; तसेच वित्तीय संस्थांच्या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून आली. त्या तुलनेत आयटी क्षेत्र; तसेच वाहन उद्योगांचे शेअर कमी प्रमाणात वाढले.

आर्थिक साह्यामुळे बॅंकांचे शेअर वधारले
---------------------------------
सरकारी बॅंकांच्या भांडवलासाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूद, विमा क्षेत्रातील थेट परकी गुंतवणूक (एफडीआय) मर्यादेत वाढ, या तरतुदींमुळे बॅंकांच्या शेअरभावामध्ये वाढ झाली. इंडसइंड बॅंकेत १४ टक्के, आयसीआयसीआय बँकेत १२ टक्के अशी घसघशीत वाढ दिसली. ‘एचडीएफसी’चा शेअर सुमारे २०४ रुपयांनी वाढून २५८२ रुपयांवर बंद झाला. ‘बजाज फिनसर्व्ह’देखील ९७९ रुपयांनी वाढून ९६९९ रुपयांवर बंद झाला. याशिवाय लार्सन अँड टुब्रो, अल्ट्राटेक सिमेंट, अॅक्‍सिस बॅंक, बजाज फायनान्स, आयटीसी, महिंद्रा अँड महिंद्रा आदी शेअरमध्ये मोठी वाढ झाली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख