ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. पुष्पा भावे यांचे निधन  - Senior Social Worker  Pushpa Bhave passed away | Politics Marathi News - Sarkarnama

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. पुष्पा भावे यांचे निधन 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 3 ऑक्टोबर 2020

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका, प्रा. पुष्पा भावे यांचे शनिवारी रात्री साडेबारा वाजता मुंबईत निधन झाले.

मुंबई : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका, प्रा. पुष्पा भावे यांचे शनिवारी रात्री साडेबारा वाजता मुंबईत निधन झाले. विद्यार्थीदशेपासून राष्ट्र सेवा दल आणि लोकशाहीवादी चळवळींशी पुष्पाताईंचा संपर्क होता. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन अशा सत्याग्रहांमध्ये त्यांनी भाग घेतला होता. 

स्वातंत्र्योत्तर काळात महागाईविरोधी आंदोलनामध्ये अहिल्याताई रांगणेकर आणि मृणाल गोरे यांच्यासमवेत पुष्पाताई या लाटणे मोर्चात हिरिरीने सहभागी झाल्या होत्या. 

मुंबईतील गिरणी कामगार संघर्ष समितीच्या चळवळीला वैचारिक मार्गदर्शन करण्यापासून कामगारांना हक्काचे घर मिळावे, यासाठी सरकारशी संघर्ष करण्यात पुष्पाताई अग्रभागी होत्या. 

स्त्रीवादी चळवळीची पाठराखण करणाऱ्या पुष्पाताईंनी दलित स्त्रियांच्या संघटनेमध्ये स्वतंत्र वैचारिक भूमिका घेत संघटन केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये त्या आरंभापासून होत्या.

 डॉ. बाबा आढाव यांच्या असंघटित कामगार चळवळीत हमाल, रिक्षावाले, कागद-काच-पत्रा वेचणारे अशा कष्टकऱ्यांच्या आंदोलनांमध्ये त्या समर्थक राहिल्या. सामाजिक कृतज्ञता निधी या सामाजिक कार्यकर्त्यांना मानधन देणाऱ्या उपक्रमामध्ये पुष्पाताई सतत अग्रभागी असत.

माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे वडील सातलिंगप्पा म्हेत्रे यांचे निधन

अक्कलकोट (सोलापूर) : कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती सातलिंगप्पा म्हेत्रे (वय 90) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी रात्री निधन झाले.  माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे व कॉंग्रेसचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांचे ते वडील होत. 

ते दुधनीचे माजी नगराध्यक्ष होते. सुमारे चाळीस वर्ष त्यांनी दुधनी नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणूनही कामकाज पाहिले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सुमारे 55 वर्षापेक्षा जास्त वर्ष  दुधनी नगरपालिकेवर सत्ता राखण्यात त्यांनी यश मिळविले होते. तालुक्‍याचे पितामह व कणखर नेते म्हणून  सातलिंगप्पा हे ओळखले जात होते. कर्नाटक राज्यातील आळंद, अफजलपूर, विजापूर व गुलबर्गा या भागात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, कृषी व शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. 

अक्कलकोट तालुक्‍यासह दुधनी नगरपरिषदची नूतन प्रशासकीय इमारतीसाठी त्यांनी सरकारकडून निधी मिळवून दिला होता. आज दुपारी अडीच वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दुधनी येथील राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार असून दुधनी येथील शेतात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख