ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांचे निधन - senior leader sudhakarpant pariacharak dies at the age of 84 | Politics Marathi News - Sarkarnama

ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांचे निधन

भारत नागणे
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

सहकारातील निष्णात नेता म्हणून पंतांची ख्याती होती. 

पंढरपूर : एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि पंढरपूरचे माजी आमदार सुधाकर परिचारक (वय 84) यांचे सोमवारी(17) रात्री 11.30 वाजता पुणे येथे निधन झाले.  आठ दिवसापूर्वी त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. श्वसनाचा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी  पुणे येथील खासगी रूग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यामागे बंधू प्रभाकर, पुतणे भाजपचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक, युटोपीयन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक असा परिवार आहे.

काल सकाळपासूनच त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. ते बरे होऊन लवकर घरी परत यावेत यासाठी त्यांचे चाहते देवाकडे प्रार्थना करत होते. परंतु मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास वाढल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. पंत या नावाने ते राज्यात परिचित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आज सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांचे पुतणे आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते म्हणून त्यांचा आजही राज्याच्या राजकारणात दबदबा कायम होता. त्यांनी पंढरपूरचे आमदार म्हणून सलग 25 वर्षे विधानसभेत 2009 पर्यंत प्रतिनिधीत्व केले होते. आधी काॅंग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीचे आमदारम म्हणून त्यांनी काम पाहिले.  मतदारसंघांची फेररचना झाल्यानंतर त्यांनी 2009 आणि 2014ची निवडणूक लढविली नाही. त्यांनी  2019 ची विधानसभा निवडणूक भाजपकडून लढविली होती. त्यात राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. त्यातून ही त्यानी स्वतःबरोबरच आपल्या कार्यकर्त्यांना सावरले होते. श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहात होते. त्यांच्याच सूचनेनुसार बैलपोळा सणासाठी दोनशे रूपयांचा हप्ताही जाहीर केला होता. सोलापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने आणि सहकारी संस्थांच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी  तोट्यातील सहकारी संस्था नफ्यात आणल्या. राज्याच्या राजकारणात  सहकारातील डाॅक्टर अशी त्यांची ओळख  होती.एक निष्कंलक आणि चारित्र्य संपन्न नेता आपल्यातून हारपल्याची भावना त्यांच्या चाहत्यांमधून व्यक्त केली जात आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख