‘सोमवारी भेटूच शॉकसाठी तयार राहा’...मनसेचे माहीम, दादरमध्ये होर्डिंग  - See you on Monday and be ready for shock MNS Mahim hoarding in Dadar | Politics Marathi News - Sarkarnama

‘सोमवारी भेटूच शॉकसाठी तयार राहा’...मनसेचे माहीम, दादरमध्ये होर्डिंग 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

‘माझे लाईट बिल, माझी जबाबदारी’, ‘सोमवारी भेटूच शॉकसाठी तयार राहा’, अशी खोचक वाक्यं या होर्डिंगजवर लिहिण्यात आली आहेत.

मुंबई : 'वाढीव वीज बिल भरू नका,' असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नागरिकांना केलं आहे. वाढीव बिलाबाबत सरकारने दिलेला शब्द पाळला नाही, हा महाराष्ट्रातील जनतेचा विश्वासघात आहे. वाढीव बिलाबाबत राज्य सरकारनं सोमवारपर्यंत (ता.23) निर्णय घ्यावा, अनथा मनसेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिला आहे. वीजबिल माफीच्या विरोधात मनसेने दंड थोपाटले आहेत. 

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी वाढीव वीज बिलांवरून राज्य सरकारवर निशाणा साधला होता. किरिट सोमय्या यांनी याबाबत टि्वट केले आहे.  सोमय्या यांनी ट्विटरवर राज्य सरकारने करोनाविरुद्ध लढण्यासाठी राबवलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या लोगोमध्ये बदल करुन त्यात वीज बिलाचा फोटो शेअर केला आहे. “माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या यशानंतर ठाकरे सरकारची नवीन योजना, "माझे लाईट बिल माझी जबाबदारी,” असा टोला किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे. हे आपल्याला एका पत्रकारांने पाठविले असल्याचे सोमय्या यांनी म्हटलं आहे.

वाढीव वीजबिलाबाबत मनसे आक्रमक झाली आहे. सोमवारनंतर वीज दरवाढी विरोधात आंदोलन करण्याचा निर्धारच मनसेने केला आहे. दरवाढी विरोधात संपूर्ण दादर-माहीम परिसरात होर्डिंगबाजी केली आहे. ‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ या राज्य सरकारच्या घोषणेलाच टार्गेट करत ‘माझे लाईट बिल, माझी जबाबदारी’, ‘सोमवारी भेटूच शॉकसाठी तयार राहा’, अशी खोचक वाक्यं या होर्डिंगजवर लिहिण्यात आली आहेत. त्यामुळे या होर्डिंग्ज सध्या चर्चेच्या विषय ठरल्या आहेत. मनसेनेचे विभाग प्रमुख यशवंत किल्लेदार यांनी हे होर्डिंग लावले आहेत.  

'सोमवारपर्यंत कुणीही वाढीव वीज बिल भरू नये,' असे आवाहन बाळा नांदगावकर यांनी नागरिकांना केले आहे. नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन नांदगावकर  सांगितले. सध्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये श्रेयवादांची लढाई सुरू आहे, असा आरोप बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारवर केला आहे.    

'सोमवारपर्यंत बील माफ करा, अन्यथा राज्यात जिल्ह्या जिल्ह्यात जनआंदोलन करण्यात येईल, ' असा इशारा मनसेने दिला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत वाढीव वीजबिलाविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
   
सोमवारपासून राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. सरकारने केलेल्या या फसवणुकीच्या निषेधार्थ नुकताच भाजपच्या मुंबई महिला आघाडीतर्फे वीज मंडळाचे मुख्यालय असलेल्या प्रकाशगडावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आमदार मनीषा चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ, शहर भाजप महिला मोर्चा अध्यक्ष शीतल गंभीर देसाई आदी हजर होत्या. 
(Edited  by : Mangesh Mahale)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख