अमेरिकेत "सातारा इफेक्ट" दिसणार.. रोहित पवार यांचे ज्यो बायडन यांच्याबाबत विधान 

“जेव्हा सभेत जोरदार पाऊस येतो तो जुन्याला वाहून लावण्यासाठी आणि नव्याला न्हाऊ घालण्यासाठी आलेला असतो, असंच म्हणावं लागेल. २०१९ ला हे महाराष्ट्राने बघितलंय आणि आता अमेरिकेतही हाच अंदाज आहे”
rohit31.jpg
rohit31.jpg

पुणे : सध्या सोशल मीडियावर अमेरिकेतील जो बायडेन यांचे फ्लोरिडातील पावसाचे भाषण चर्चेत आहे.  ज्यो बायडेन हे अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी आहेत. ज्यो बायडेन यांच्या भाषणाची तुलना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सातारा येथील भाषणाशी होत आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांनी टि्वट करून प्रतिक्रिया दिली आहे. 

आपल्या टि्वटमध्ये रोहित पवार म्हणतात की  “जेव्हा सभेत जोरदार पाऊस येतो पण नेता आणि जनता तसूभरही विचलित होत नाही तेव्हा तो पाऊस जुन्याला वाहून लावण्यासाठी आणि नव्याला न्हाऊ घालण्यासाठी आलेला असतो, असंच म्हणावं लागेल. २०१९ ला हे महाराष्ट्राने बघितलंय आणि आता अमेरिकेतही हाच अंदाज आहे” 

 
राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या साताऱ्यातील भर पावसाच्या सभेनं महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलली. या सभेला नुकतेच वर्ष झाले आहे. यानिमित्ताने अनेकांनी शरद पवार यांच्या या सभेबाबत आठवणींना उजाळा दिला होता. या घटनेची नोंद राजकीय इतिहासात ठळकपणे झालीच पण विरोधकांच्या स्वप्नांवरही पाणी फेरलं गेलं. या सभेनं लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसलेंचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीला या सभेचा फायदा झाला. आता अशीच एक सभा अमेरिकेत झाली आहे.

साताऱ्यातील शरद पवारांचं भाषण ऐकायचा मोह खुद्द वरुणराजाला देखील आवरला नाही. वरुन मेघराजा बरसत होता आणि त्याच जलधारा अंगावर घेत व्यासपीठावर ८० वर्षाचा तरुण जाणता राजा गर्जत होता. पण साहेबांचे विचार ऐकण्यासाठी झालेली अलोट गर्दी किंचितही विचलित न होता स्तब्ध होती. पवारांचा एक एक शब्द कानात साठवून ठेवत होती. अशीच एक सभा सध्या अमेरिकत चर्चेचा विषय झाली आहे. या सभेचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यानिमित्ताने पुन्हा एकदा शरद पवार यांच्या सभेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.  

डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांच्या भाषणावेळी वादळी पाऊस सुरू झाला. पाऊस थांबत नव्हता. मात्र अशा पावसातही बायडन यांनी जोरदार भाषण केलं.. अन् उपस्थितांची मने जिंकली. बायडन यांची रॅली होती. गर्दी जमून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी समर्थकांना कार घेऊन रॅलीला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बायडन यांचे समर्थक कारमधून त्यांचं भाषण ऐकत होते. या रॅलीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बायडन यांनीदेखील त्यांच्या ट्विटर हॅडलवरून सभेतील फोटो ट्विट केला आहे. 

अमेरिकेतील अनेक जणांना बायडन यांच्या भाषणानंतर माजी अध्यक्ष बराक ओबामांच्या १२ वर्षांपूर्वीच्या भाषणाची आठवण झाली आहे. तर  बायडन यांच्या सभेचे वृत्त, व्हिडिओ पाहिल्यानंतर काहींना शरद पवार यांच्या साताऱ्यातील सभेची आठवण झाली.  बायडन यांनी टि्वट करून हा फोटो शेअर केला आहे.  त्यांना म्हटल आहे की "हे वादळ जाईल आणि नवा दिवस येईल" 

तीन दिवसांनंतर अमेरिकेत मतमोजणी आहे. अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि माजी उपाध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांनी प्रचारात धडाका लावला आहे. दोन्ही नेत्यांच्या फ्लोरिडामध्ये सभा झाल्या. रिपब्लिकन पक्षाचं सरकार पुन्हा आणण्यासाठी फ्लोरिडा राज्य महत्त्वाचं आहे.  डोनाल्ड ट्रम्प यांना पावसात केस ओले होण्याची भीती वाटते. पण बायडन यांना तशी भीती वाटत नाही, अशा प्रकारची ट्विट्स बायडन यांच्या भाषणानंतर सोशल मीडीयावरून व्हायरल होत आहेत. 
  Edited  by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com