शशिकलांच्या 'एंट्री'च्या नुसत्या चर्चेनेच अण्णाद्रमुकमध्ये दुफळी

तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून शशिकलांच्या पुन्हा राजकारणात येण्याची चर्चा रंगली आहे.
Sasikala will not be taken back in adimk say Minister D jayakumar
Sasikala will not be taken back in adimk say Minister D jayakumar

चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला यांना पक्षाची दारे बंद आहेत, असे जाहीर करणाऱ्या अण्णाद्रमुकने पुन्हा एकदा शशिकलांसाठी पायघड्या अंथरल्या आहेत. खुद्द उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनी शशिकलांना खुले आमंत्रण दिले आहे. पण त्यावरून पक्षात दुफळी निर्माण झाली आहे. 

तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तुरूंगातून सुटून आल्यानंतर शशिकला राजकारणात सक्रीय होणार का? हा प्रश्न होता. पण काही दिवस आधीच त्यांनी राजकारणात येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पक्षापुढची अडचण दूर झाली. पण शशिकला पुन्हा पक्षात आल्यास त्याचा फायदा होईल, असा एक प्रवाह होता. पण शशिकलांना पक्षात न घेण्यास मुख्यमंत्री एडापड्डी पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांचा सर्वांत जास्त विरोध होता. पलानीस्वामी हे सरकारचे नेतृत्व करीत आहेत तर पनीरसेल्वम हे पक्षाचे नेतृत्व करीत आहेत. 

आता निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचलेला असताना पनीरसेल्वम यांनी  शशिकलांना पुन्हा एकदा पक्षात येण्याचे आमंत्रण दिले आहे. त्यावरून पक्षात दुफळी निर्माण झाली आहे. पक्षाचे प्रदेश चिटणीस व ज्येष्ठ मंत्री डी. जयकुमार यांनी उघडपणे त्याला विरोध केला आहे. पक्षाची जी भूमिका आहे, तीच माझी भूमिका आहे. शशिकलांना पून्हा पक्षात घेतले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पनीरसेल्वम यांच्या भूमिकेवरून पक्षात एकमत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणुकीदरम्यान पक्षात दोन प्रवाह निर्माण झाल्याने त्याचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

काय म्हणाले होते पनीरसेल्वम?

शशिकलांनी चार वर्षे कारागृहात घालवली आहेत. त्यांनी अम्मांसोबत (जयललिता) ३२ वर्षे काम केले आहे. मानवतेच्या भूमिकेतून आम्ही त्यांचा विचार करीत आहोत. पक्षाची सध्याची रचना मान्य असेल तर त्या पुन्हा परतण्याचा विचार करु शकतात. पक्ष हा एका व्यक्ती अथवा कुटुंबासाठी चालत नसतो. मी आधी त्यांना विरोध केला असला तरी माझ्या मनात त्यांच्याबद्दल वाईट काही नाही, असे पनीरसेल्वम म्हणाले आहेत. 

भाजपने तमिळनाडूत अण्णाद्रमुकशी आघाडी केली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत २०१९ मध्ये  मतविभाजणी झाली होती. तसा प्रकार होऊन नये यासाठी अण्णाद्रमुक एक राहावा म्हणून भाजपने प्रयत्न केले. याबद्दल मी त्यांचे आभार मानते, असे शशिकलांनी म्हटले होते. मागील लोकसभा निवडणुकीत भाजप आणि अण्णाद्रमुक आघाडीचा तमिळनाडूत मोठा पराभव झाला होता. अण्णाद्रमुकला केवळ एक जागा मिळाली होती. त्याचवेळी द्रमुक आणि काँग्रेस आघाडीला तब्बल ३८ जागा मिळाल्या होत्या. 

दरम्यान, जयललिता यांच्या निधनानंतर शशिकलांनी पनीरसेल्वम यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा घेतला होता. नंतर कारागृहात जाण्याआधी त्यांनी एडापड्डी पलानीस्वामी यांना मुख्यमंत्री बनवले होते. यामुळे पनीरसेल्वम यांनी बंड केले होते. नंतर दोघांमध्ये समेट होऊन ते शशिकलांच्या विरोधात एकत्र आले होते. त्यांनी शशिकला तुरुंगात असताना त्यांची आणि त्यांचे भाचे टी.टी.व्ही.दिनकरन यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com