‘आंदोलनजीवी’ म्हणणाऱ्या मोदींना ‘गोध्राकांड’ आंदोलनानेच दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचविले...  - Sanjay Raut targets Narendra Modi over farmers agitation | Politics Marathi News - Sarkarnama

‘आंदोलनजीवी’ म्हणणाऱ्या मोदींना ‘गोध्राकांड’ आंदोलनानेच दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचविले... 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 14 फेब्रुवारी 2021

संसद दिवसेंदिवस मृतप्राय होत आहे. कारण रस्ते सुनसान व्हावेत असे फर्मान पंतप्रधान मोदी यांनी काढले आहे.

मुंबई : ‘गोध्राकांड’ आंदोलनाने मोदी व शहा यांना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचविले. त्या मानाने दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱयांचे आंदोलन शांत आणि सौम्य आहे. शिस्त पाळून आहे. हे आंदोलन ‘कॉर्पोरेट व्यवस्था’ आणि भांडवलदारांच्या विरोधात असल्यामुळे शेतकरी बदनाम केला जात आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक या सदरातून केली आहे.

ज्या लोकशाहीतले रस्ते सुनसान असतात त्या देशाची संसद मृतप्राय होते, असे एक विधान राम मनोहर लोहिया यांनी केल्याचे आठवते. आज लोहियांचे बोल खरे होताना दिसत आहेत. संसद दिवसेंदिवस मृतप्राय होत आहे. कारण रस्ते सुनसान व्हावेत असे फर्मान पंतप्रधान मोदी यांनी काढले आहे. देशातील आंदोलने थांबवा. आंदोलने म्हणजे परकीय शक्तीचा कट. काही लोक फक्त आंदोलनांवरच जगत आहेत. ‘आंदोलनजीवी’ असा उल्लेख करून पंतप्रधानांनी रस्त्यावर उतरणाऱया कार्यकर्त्यांची थट्टा केली आहे, असा आरोप राऊत यांनी केला आहे. 

आंदोलन हे फक्त रस्त्यावरचेच असते असे नाही. त्याच्या विविध तऱहा आहेत. देश स्वतंत्र झाला तेव्हा लोकमान्य टिळकांना 1906 मध्ये शिक्षा झाली. त्या चुकीचे परिमार्जन करण्याचे ठरले. मग हायकोर्टात एक फलक लावला गेला- ‘न्यायालयाने मला दोषी ठरविले असले तरी या न्यायालयापेक्षा श्रेष्ठ असे न्यायालय आहे व त्याच्यापुढे मी निर्दोष आहे.’ या अर्थाची लोकमान्यांची धीरोदात्त वाक्ये या फलकावर कोरण्यात येऊन त्याचे समारंभपूर्वक अनावरण तत्कालीन मुख्य न्यायाधीश एम. सी. छागला यांच्या हस्ते करण्यात आले. लोकमान्यांना शिक्षा झाली तेव्हा आपण कुमार होतो आणि चीड येऊन हातात दगड घ्यावा असे वाटले, असे त्या वेळी छागला म्हणाले. म्हणजे लोकमान्यांनी एक आंदोलन केले व न्या. छागला यांच्या मनातही आंदोलनाचे विचार उसळले. ज्यांच्या मनात अन्यायाविरुद्ध संताप व स्वाभिमानाची ठिणगी पेटली आहे तोच आंदोलन करतो. बाकी सगळे मग कुचकामीच ठरतात, असे रोखठोकमध्ये म्हटलं आहे.

अनेक आंदोलनांनी गांधीजींनी देश एका झेंडय़ाखाली एकवटवला, एकजिनसी केला. गांधीजींची उपोषणे हे सुद्धा आंदोलनच होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचे आंदोलन केले. अस्पृश्यांच्या अस्मितेसाठी लढा दिला. ते आंदोलन नव्हते तर दुसरे काय होते? संसदेच्या आवारात अनेक पुतळे विराजमान आहेत. त्या प्रत्येक पुतळ्याला आंदोलनाचा इतिहास आहे. तो प्रत्येक पुतळा आता जिवंत होऊन सांगत आहे, ‘आम्ही आंदोलने केली म्हणून तुम्ही सिंहासनावर बसला आहात.’ असे राऊत यांनी म्हटलं आहे. 

काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी...

  1. राम मंदीराचे आंदोलन झाले नसते तर आजचा भाजप दिसला नसता. 
  2. मोदी ‘आंदोलनजीवी’ अशी खिल्ली उडवतात तेव्हा स्वातंत्र्य चळवळीचाही अपमान होतो!
  3. मोदी व गृहमंत्री शहा हे आज ‘आंदोलना’ची खिल्ली उडवत आहेत.
  4. साबरमती एक्प्रेस जाळल्यावर जे भयंकर गोध्राकांड झाले, त्यातूनच मोदी हे हिंदू समाजाचे नवे मसिहा बनले.
  5. भारतीय जनता पक्षाची सर्व आंदोलने झाली. ती मग फक्त राजकीय हितासाठी व सत्ताप्राप्तीसाठीच झाली असे म्हणावे लागेल.
     
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख