संजय राऊत म्हणाले, "सरकार सुडभावनेनं काम करीत नाही..येथे कायद्याचं राज्य आहे..  - Sanjay Raut said Government is not working in good faith There is rule of law  | Politics Marathi News - Sarkarnama

संजय राऊत म्हणाले, "सरकार सुडभावनेनं काम करीत नाही..येथे कायद्याचं राज्य आहे.. 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

"महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. येथे कुणाचाही आवाज दाबला जात नाही, पोलिसाकडे सबळ पुरावे असल्याशिवाय ते कुणालाही अटक करीत नाहीत"  

मुंबई : "महाराष्ट्र सरकार सुडभावनेनं काम करीत नाही, पोलिसांकडे पुरावे असतील तर कुणावरही कारवाई करू शकतात, " असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं. रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सीआयडीने त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले. यानंतर पत्रकारांशी राऊत बोलत होते. "महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. येथे कुणाचाही आवाज दाबला जात नाही, पोलिसाकडे सबळ पुरावे असल्याशिवाय ते कुणालाही अटक करीत नाहीत," असे राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. 

खासदार संजय राऊत म्हणाले, "अभिनेता सुशांतसिह प्रकरणात राज्य सरकारवर अर्णब गोस्वामी यांनी आरोप केले आहेत, याबाबतही चैाकशी व्हायला पाहिजे. या राज्यात कोणी चुकीचं काम करीत असेल, त्याच्यावर कारवाई करण्याचे काम पोलिस यंत्रणा करीत असते, मग ते पत्रकार, अभिनेता, वकील कुणीही का असो. त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. जे चुकीचं काम करतील त्यांच्यावर कारवाई होणारच" 
 
"एका पत्रकाराला अटक होते, आजचा दिवस हा काळा दिवस म्हणून पाळला पाहिजे," असे पत्रकाराने विचारलेल्या एका प्रश्नाला राऊत यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की प्रसारमाध्यमांबाबत सुप्रीम कोर्टानं आपलं निरीक्षण नोंदविले आहे.  "प्रसारमाध्यमे म्हणजे तुम्ही न्यायालय नाही, तुम्ही कोणाच्याही विरोधात काहीही व्यक्तव्य करू शकत नाही," असं निरीक्षण सुप्रीम कोर्टानं नोंदविलं असल्याचे राऊत यांनी सांगितले. 

इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या २०१८ मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज महाराष्ट्र सीआयडीने त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले. पोलिसांनी आपल्याला व आपल्या सासू-सासऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप अर्णब गोस्वामी यांनी केला आहे. पोलिस अर्णब यांना घेऊन अलिबागकडे रवाना झाले आहेत. 

आज सकाळीच सुमारे डझनभर पोलिस अर्णब यांच्या निवासस्थानी गेले. तेथून त्यांना अक्षरशः उचलून पोलिस व्हॅनमध्ये कोंबण्यात आल्याचा आरोप रिपब्लिक टिव्हीने केला आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आला आहे. याशिवाय अर्णब गोस्वामी यांच्यावर पोलिसांकडून जबरदस्ती करत धक्काबुक्की करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे

२०१८ मध्ये इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या मातुश्री कुमुद नाईक अलिबाग येथे मृतावस्थेत सापडले होते. या दोघांनीही आत्महत्या केली होती. त्यावेळी पोलिसांना अन्वय यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. अर्णब गोस्वामी व अन्य दोघांनी आपणास व्यवहाराचे ५ कोटी ४० लाख रुपये न दिल्याने आपण आर्थिक अडचणीत आलो असून त्यामुळे आत्महत्या करावी लागत असल्याचे या चिठ्ठीत म्हटले होते. त्यावेळी पोलिसांनी अर्णब यांच्या विरोधात अन्वय व त्यांच्या आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. ही फाईल नंतर बंद करण्यात आली. या वर्षीच्या मे महिन्यात अन्वय यांची कन्या अज्ञा नाईक हिने हा तपास नीट झाला नसल्याची तक्रार केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीआयडी चौकशीचा आदेश दिला होता. 

 Edited  by : Mangesh Mahale
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख