संजय राऊतांचा प्रश्न .. ‘रिपब्लिक’चा बोलावता धनी कोण आहे...?   - Sanjay Raut question as to who will provide money to Republic | Politics Marathi News - Sarkarnama

संजय राऊतांचा प्रश्न .. ‘रिपब्लिक’चा बोलावता धनी कोण आहे...?  

सरकारनामा ब्युरो
रविवार, 11 ऑक्टोबर 2020

अर्णब गोस्वामी व त्यांच्या चॅनेलने सुशांत प्रकरणात ज्या आरोळ्या ठोकल्या त्या त्यांच्याच घशात मुंबई पोलिसांनी घातल्या

मुंबई : "सुशांतसिंह राजपूत प्रकरण हे मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी कसे वापरण्यात आले याचा स्पष्ट खुलासा आता झाला आहे. याबाबत स्वतःला नैतिकतेचे पुतळे समजणारे लोक दुसऱयांना गुन्हेगार ठरवण्यासाठी स्वतः पांढरपेशी दरोडेखोर होतात व समाजातला एक वर्ग या दरोडेखोरीचे समर्थन करतो हे भयंकर आहे," असा सवाल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या रोखठोकमधून खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. 

मुंबई पोलीस, मुख्यमंत्री ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख व संजय राऊत यांच्यावर एकेरी उल्लेख करून चिखलफेक करण्यासाठी पैशांचा वापर झाला. हे पैसे नक्की कुठून आले, त्यांचा बोलवता धनी आणि पैसे पुरवणारा धनी कोण हे स्पष्टपणे समोर आले पाहिजे, पण चोराच्या उलटय़ा बोंबा सुरू आहेत. त्या चोरांना महाराष्ट्राने आता सोडू नये, असे मत 'सामना'तून व्यक्त करण्यात आले आहे.

अर्णब गोस्वामी व त्यांच्या चॅनेलने सुशांत प्रकरणात ज्या आरोळ्या ठोकल्या त्या त्यांच्याच घशात मुंबई पोलिसांनी घातल्या. गोस्वामींचे ‘रिपब्लिक’ चॅनेल हा एक आर्थिक घोटाळा आहे व टीआरपी वाढावा यासाठी घरोघरी पैसे वाटले गेले हा खुलासा पोलिसांनी केला. सुशांत प्रकरणात या चॅनेलचे किंचाळणे मतलबी होते. त्यामागे राजकीय षड्यंत्र होते, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. 

सुशांतसिंह राजपूत प्रकरणी राज्य सरकार व मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी 80 हजार फेक अकाऊंटस् समाज माध्यमांवर निर्माण केली. त्यात  एका वृत्तवाहिनीच्या टीआरपी घोटाळ्याची भर आहे.  मुंबई पोलिसांनी हे सर्व समोर आणले. पोलिसांचे पाय आता कोणी खेचू नयेत, असे यात स्पष्ट केले आहे.

ज्यांनी समाज माध्यमांतून राहुल गांधींना ‘पप्पू’ ठरवले, मनमोहन सिंग यांना ‘मौनी बाबा’ ठरविले, त्याच लोकांनी सुशांतचे आत्महत्या प्रकरण एक पर्वणी मानले. सुशांतला न्याय वगैरे देण्याच्या भानगडीत त्यांना पडायचे नव्हते. सुशांतनिमित्ताने त्यांना पोलीस, सरकार व ठाकरे कुटुंबाची बदनामी करायची होती. राजकारणात बदनामी आणि चारित्र्यहनन हेच सगळय़ात मोठे हत्यार आहे व सोशल मीडिया त्या हत्याराचा कारखाना बनला आहे, अशी टिका 'सामना'तून करण्यात आली आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख