महाराष्ट्र सरकारचे पाय खेचण्याचा प्रयत्न कराल तर…  

राज्यपालांनी लोकनियुक्त सरकारची राजकीय कारणासाठी अडवणूक करु नये.
 Sanjay Raut, Bhagat Singh Koshyari .jpg
Sanjay Raut, Bhagat Singh Koshyari .jpg

नवी दिल्ली : राज्य सरकारची अडवणूक राज्यपालांनी करु नये. सरकारला मदत करण्यासाठी राजभवन असते, त्यांचा पाय खेचण्यासाठी नसते. पाय खेचण्याचा प्रयत्न केला तर तुमचाच पाय गुंत्यात अडकून पडाल, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर केली आहे. राऊत दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Sanjay Raut criticizes Governor Bhagat Singh Koshyari) 

राज्यपालांनी लोकनियुक्त सरकारची राजकीय कारणासाठी अडवणूक करु नये. विधानपरिषद सदस्यांच्या नियुक्त्या असतील किंवा एमपीएमसीसंबंधी नियुक्त्या असतील. हा राजकीय दबावाचाच एक प्रकार आहे. राज्यापालांचे बोलवते धनी कोणी इतर असते. त्यांनी अशा वादात पडू नये. मात्र, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये सातत्याने हे दिसत आहे,'' असे राऊत म्हणाले.

त्यांना कोणी हस्तक्षेप करायला लावत आहे का हे पहावे लागेल. जी कामे मंत्रिमंडळाची, मुख्यमंत्र्यांची आहेत त्यात घुसण्याचा प्रयत्न होत आहे.   राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी सांगितलेले मी ऐकले. हे घटनाविरोधी आहे. राज्यपालांना सरकारच्या कामाचा आढावा घेण्याचा अधिकार आहे, त्यासाठी गाव स्तरावर दौरे काढण्याची गरज नाही. इतर राज्यतही पूर आले आहेत. मात्र, भाजपशासित इतर राज्यांमध्ये राज्यपाल दौरे काढताना दिसत नाहीत. हे पाहिल्यानंतर महाराष्ट्र  व पश्चिम बंगालमधील राज्यपाल असे का वागत आहेत हे समजेल किंवा असे वागण्यास का प्रवृत्त केले जात आहे, असा सवाल राऊत यांनी केला. 

राज्यपालांचे काम मर्यादित स्वरुपाचे असते. त्यांनी मंत्रिमंडळाच्या शिफारसी, निर्णयांचे पालन करावे आणि सरकारच्या कामात हस्तक्षेप करु नये असे घटनेत आहे. त्यांनी हे नियम पाळले तर बरे होईल, असेही राऊत म्हणाले.

केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त मदतीची अपेक्षा आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. कालची मदत ही राज्य सरकारने केलेली आहे. आम्ही पॅकेज शब्द वापरत नाही. केंद्राने जेवढी गरज आहे तेवढे द्यावे. विमा कंपन्यासंदर्भात आम्ही काही भूमिका घेतल्या. अनेकांची कागदपत्रे वाहून गेली आहेत. अशावेळी केंद्र सरकारने विमा कंपन्यांना सूचना द्याव्यात आणि तोडगा काढावा, अशी विनंती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना केली आहे, अशी माहिती राऊत यांनी दिली.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात छोट्या उद्योगांचे नुकसान झाले असून नारायण राणे यांच्याकडे यासंबंधी खाते आहे त्या विषयी विचारले असता, ते म्हणाले की ''आम्ही आधीच मागणी केली आहे. महाड आणी इतर मोठे उद्योग असणाऱ्या ठिकाणी औद्योगिक विभागाला फटका बसला आहे. हे भाग महाराष्ट्रासह देशालाही मोठा महसूल मिळवून देतात. त्यासंदर्भात केंद्र सरकारने वेगळी भूमिका घेण्याची गरज नाही. त्यातील बराचसा महसूल केंद्राला जातो.''

राहुल गांधींसोबतच्या फोटोवर म्हणाले…

आम्ही महाराष्ट्रात हातात हात घालून काम करत आहोत. हातातला हात खांद्यावर आला इतकेच. आमचे चांगले संबंध आहेत. एकत्र राज्य, सरकार चालवताना फक्त पक्षच नाही तर मनही जवळ यावी लागतात. त्यादृष्टीने काही पावल पडत असतील तर लोक स्वागत करतील, असे राऊत म्हणाले. राहुल गांधी यांची आणि माझी चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे काही निरोपही मी त्यांना दिले आहेत. महाविकास आघाडीबाबत तेदेखील समाधानी आहेत. सरकार एकत्रितपणे चालत असल्याचा त्यांना आनंद आहे, असे राऊत यांनी सांगितले.

Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com