मुंबई : ट्रम्प यांच्या प्रचारासाठी मोदी यांनी अमेरिकेत व अहमदाबादेत प्रचार सभा घेतल्या. तोसुद्धा त्यांच्या देशातला हस्तक्षेप होता. त्यामुळे रिहानाचा विषय हा स्वतंत्र आहे. गाझीपूरच्या सीमेवरील शेतकऱयांना जागतिक पाठिंबा मिळत असेल तर त्याचा विचार सरकारने करायला हवा, असे मत सामनातील रोखठोक या सदरात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
दिल्लीच्या सीमेवरील गाझीपूरला शेतकऱयांचे आंदोलन पेटले आहे. जगभरातून त्यांना पाठिंबा मिळतोय. हा आपल्या देशात हस्तक्षेप असल्याचा अपप्रचार सुरू झालाय. गाझीपूरचे आंदोलन हे बंडखोर किंवा देशद्रोह्यांचे नाही. ते आपल्या हाडामांसाचे शेतकरी आहेत. ते ‘जयहिंद’चा नारा देत लढत आहेत. पॉपस्टार रिहाना हिने सातासमुद्रापलीकडून शेतकरी आंदोलनास पाठिंबा देताच येथे अनेकांना मिरच्या झोंबल्या. परदेशातील लोकांनी येथील कलाकारांचे कौतुक केलेले चालते. पण लढणाऱया शेतकऱयांचे कौतुक केले हा आपल्या देशातील हस्तक्षेप वाटतो. आता रिहानाच्या समर्थनासाठी जे उभे राहतील त्यांना ‘देशद्रोही’ ठरवले जाईल. देशद्रोहाचा कायदा आपल्या देशात कमालीचा स्वस्त झाला आहे, पण गाझीपूरच्या सीमेवर प्रत्येक तंबूवर तिरंगा फडकतो आहे. देशभक्तीची गाणी लागली आहेत. सरकारच्या पगडीलाच शेतकऱयांनी हात घातला. म्हणजे त्यांनी देशद्रोहच केला! लोकशाही व नीतिमत्तेच्या गप्पा आता फक्त तोंडी लावायला. प्रत्यक्षात दिल्लीच्या दिव्याखाली अंधार आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
अमित शहांच्या दौऱ्यानंतर राज्यात भाजपचा मुख्यमंत्री असेल #Sarkarnama #MarathiNews #SarkarnamaNews #PoliticalNews #AmitShah #Visit #BJP #ChiefMinister #Maharashtra #PramodJathar @BJP4Maharashtra https://t.co/SsEvUHZoQP
— Sarkarnama (@SarkarnamaNews) February 6, 2021
संजय राऊत म्हणतात..
गाझीपूर या सध्या गाजत असलेल्या देशाच्या युद्धभूमीवर मंगळवारी दुपारी पोहोचलो. देशाच्या सीमेपेक्षा गाझीपूरच्या सीमेवर काय हालचाली सुरू आहेत याकडे जगाचे लक्ष आहे. तीन कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी शेकडो शेतकरी गाझीपूरच्या सीमेवर तीन महिन्यांपासून ठाण मांडून बसले आहेत व सरकार त्यांचे ऐकण्याच्या मनःस्थितीत दिसत नाही. जगभरातून शेतकरी आंदोलनास पाठिंबा मिळत आहे. पॉपस्टार रिहाना हिने दिल्लीतील शेतकऱयांच्या आंदोलनास पाठिंबा देताच पंतप्रधान मोदी यांच्या भक्तांत एकच खळबळ उडाली. स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भाची मीना हॅरिस या उघडपणे शेतकऱयांच्या समर्थनासाठी उतरताच अक्षय कुमार, कंगना राणावत, सचिन तेंडुलकरपासून ते लता मंगेशकरपर्यंत सर्व ‘सेलिब्रिटीं’नी अचानक आपली मते समाजमाध्यमांवर व्यक्त केली. ‘शेतकरी आंदोलन हा आमचा देशांतर्गत विषय आहे त्यात विदेशी हस्तक्षेप नको,’ असा साक्षात्कार या प्रमुख मंडळींना झाला. पण गेल्या तीन महिन्यांपासून शेतकरी एकाकी झुंज देतोय त्यावर साध्या संवेदनाही या प्रमुख मंडळींनी व्यक्त केल्या नाहीत. म्हणजेच आंतरराष्ट्रीय पाठिंबा शेतकऱयांना मिळू लागताच, सरकारने त्यांच्या विरोधात या ‘सेलिब्रिटीज्’ना उतरवले. शेतकऱयांचा लढा हा माणुसकी व न्याय्य हक्काचा लढा आहे. जगभरातून अशा प्रत्येक लढय़ास मानवतावादी पाठिंबा देतच असतात. शेतकरी देशात बंडाळी करू इच्छित नाहीत व ते देश तोडायला निघाले नाहीत.
- गाझीपूर तेथे धड पोहोचता येऊ नये म्हणून सरकारने अनेक अडथळे उभे केले. पोलीस व सुरक्षा दलाचे जवान आहेतच. आता फक्त सैन्य आणि हवाई दल काय ते आणायचे बाकी राहिले आहे.
- हे सर्व कोणाच्या विरोधात? तर आपल्याच शेतकऱयांना मागे हटविण्यासाठी. शेतकऱयांना देशाचे दुश्मन मानून सरकार लढाईच्या मैदानात उतरले.
- गाझीपूरच्या युद्धभूमीचे सेनापती राकेश टिकैत स्वागतासाठी समोर आले. त्यांनी आलिंगन दिले. ‘‘लढाई आता संपणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत सुरूच राहील. सरकारची तीच इच्छा दिसते,’’ असे ते म्हणाले.
- गाझीपूर सीमेवरील 235 तरुण बेपत्ता आहेत. त्यातल्या 140 जणांचा शोध आता तिहार तुरुंगात लागला. उरलेले आजही बेपत्ता आहेत.

