पंढरपूर पोटनिवडणुकीत यशवंत सेनेची उडी..संजय माने यांना उमेदवारी - Sanjay Mane candidature from Yashwant Sena in Pandharpur election | Politics Marathi News - Sarkarnama

पंढरपूर पोटनिवडणुकीत यशवंत सेनेची उडी..संजय माने यांना उमेदवारी

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 19 मार्च 2021

 यशवंत सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय माने यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

पंढरपूर : पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरू केली आहे. यशवंत सेनेने पोटनिवडणुकीत उडी घेतली आहे. यशवंत सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय माने यांना उमेदवारी जाहीर करून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. येत्या 24 एप्रिल रोजी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती राज्य संघटक राजेंद्र बुध्याळ यांनी दिली.

पंढरपूरचे  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी येत्या 17 एप्रिल रोज पोटनिवडणूक होणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर प्रथमचराज्यातील विधानसभेची पहिली पोट निवडणुक होत आहे. ही निवडणुक महाविकास आघाडीच्या प्रतिष्ठेची तर विरोधी भाजपचे अस्थित्व सिध्द करणारी आहे. त्यामुळे 2 मेच्या येथील निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारच्या दीड वर्षाच्या कारभाराची लिटमस चाचणी  होणार आहे. भारत भालकेंच्या पत्नी जयश्री भालकेंना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तसे झाले  तर विरोधी भाजपकडूनही महिला उमेदवार देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यामध्ये भाजपकडून आमदार प्रशांत परिचारकांच्या कट्टर समर्थक पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांचे नाव आघाडीवर आहे.  

शिवसेनेच्या जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा व जिल्हा परिषदेच्या सदस्या शिला गोडसे यांनीही निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यांनीही महाविकास आघाडीकडे उमेदवारीची मागणी केली आहे. महाविकास
आघाडीने उमेदवारी नाकारली तर अपक्ष निवडणुक लढणार असल्याचे त्यांनी यापूर्वीच जाहीर केला आहे. पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत भालके, भोसले आणि गोडसे अशी तिरंग लढत होण्याची अधिक शक्यता राजकीय
जाणकारांमधून व्यक्त केली जात आहे.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे येथील पोटनिवडणूक राष्ट्रवादीसाठी सोपी समजली जात असली तरी ती तितकी सोपी राहिली नसल्याची चर्चा आहे. दुसरीकडे भाजपचे आमदार प्रशांत परिचारक आणि संत दामाजी कारखान्याचे समाधान आवताडे यांचीही भूमिका अद्याप गुलदस्त्यात असल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला प्रयत्नांची पराकष्टा करावी लागणार आहे. 

भाजप लाटेतही भालकेंनी राखला होता गड 
आमदार भारत भालके यांचे या मतदारसंघावर गेल्या 11 वर्षांपासून वर्चस्व होते. त्यांनी 2009 मध्ये पहिल्यांदा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2014 मध्ये भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांचाही त्यांनी पराभव करून आपली ताकद दाखवून दिली होती. राज्यात 2019 मध्ये भाजपची लाट असतानाही ज्येष्ठ नेते, माजी आमदार सुधाकर परिचारक यांचाही त्यांनी धक्कादायक पराभव करत विजयाची हॅटट्रीक साधली होती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख