बिजली मल्ल, माजी आमदार संभाजी पवार यांचे निधन - Sangli BJP Former MLA Sambhaji Pawar passes away | Politics Marathi News - Sarkarnama

बिजली मल्ल, माजी आमदार संभाजी पवार यांचे निधन

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 15 मार्च 2021

बिजली मल्ल, माजी आमदार संभाजी पवार यांचे रविवारी रात्री निधन झाले आहे.

सांगली : प्रतिस्पर्धी मल्लाला कुस्ती सुरू होऊन डोळ्याचे पाते लवते न लवते तोच धोबीपछाड देण्याची खासियत असणारे बिजली मल्ल आणि माजी आमदार संभाजी पवार यांचे रविवारी रात्री उशिरा निधन झाले आहे.

त्यांच्या मागे पत्नी, दोन पुत्र, बंधू, पुतणे असा परिवार आहे. आज दुपारी 12 वाजता त्याच्या राहत्या घरातून अंत्ययात्रा निघणार आहे. 1 वाजता मारुती चौकात अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येणार आहे.. आणि त्यानंतर अंत्यसंस्कार होणार आहे.

गेले काही वर्षे ते पार्किन्सनच्या जुनाट आजाराने त्रस्त होते. गतवर्षी मुंबईच्या नानावटी रुग्णालयात उपचार घेताना त्यांना करोनाची लागण झाली होती. मात्र, त्यावरही त्यांनी हिमतीने मात केली होती. वज्रदेही मल्ल हरी नाना पवार यांचे पुत्र म्हणून महाराष्ट्राला त्यांची ओळख झाली. मात्र, एकाहून एक सरस कुस्त्या क्षणार्धात निकाली लावायच्या त्यांच्या खासियतीमुळे बिजली मल्ल म्हणून ते प्रसिद्ध झाले. महाराष्ट्र कर्नाटक पंजाब हरियाणा आदी राज्यांमध्ये त्यांचा मोठा चाहता वर्ग होता. 

याच क्रीडा कामगिरीच्या जोरावर त्यांनी राजकीय क्षेत्रातही नशीब आजमावले आणि स्व. वसंतराव दादा पाटील यांच्या हयातीत त्यांचे पुतणे सहकारमहर्षी विष्णु अण्णा पाटील यांचा सांगली मतदार संघातून विधानसभेला पराभव करून त्यांनी जायंट किलर अशी ख्याती मिळवली होती.

शेतकऱ्यांच्या कामगारांच्या आणि सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभा दणाणून सोडणाऱ्या संभाजी पवार यांना जनता दलाने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीही सोपवली होती. 2009 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशासाठी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. 2014 मध्ये पक्षातील स्थानिक नेत्यांशी झालेल्या मतभेदानंतर ते राजकीय दृष्ट्या बाजूला झाले होते. मात्र, तरी सातत्याने विविध प्रश्नांवर ते आपली मते मांडत होते. सर्वसामान्यांचा नेता हरपल्याची हळहळ सांगलीत व्यक्त होत आहे. 
 
हेही वाचा : शेतकऱ्यांना  तीन लाखांपर्यंत  शून्य टक्क्याने कर्जपुरवठा
 
मालेगाव : शेतक-यांना यंदाच्या हंगामापासून तीन लाखांपर्यंतच्या कर्जावर शुण्य टक्के व्याज असेल. त्यासाठी त्यांन ीनियमित कर्जफेड करणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपली कर्जफेड वेळेत करण्यास सुरवात करावी, असे राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. ते म्हणाले, व्याजाच्या जाचातून शेतकऱ्यांची मुक्तता व्हावी व शेतकरी थकबाकीदार होऊ नये, यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख