संभाजीराजेंनी मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार  - Sambhaji Raje thanked Chief Minister Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

संभाजीराजेंनी मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार 

सरकारनामा ब्यूरो 
शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020

आम्ही आमच्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या होत्या. त्या मागण्या त्यांनी मान्य केल्या.

मुंबई : राज्य लोकसेवा आयोगाची रविवारी (ता. 11 ऑक्‍टोबर) होणारी परीक्षा मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढे ढकलण्यात आल्याचे शुक्रवारी (ता. 9 ऑक्‍टोबर) सायंकाळी जाहीर केले. हा निर्णय घेतल्याबद्दल खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत. 

उद्धव ठाकरे यांनी एमपीएससी परीक्षेसंदर्भातील निर्णय जाहीर केल्यानंतर संभाजीराजे यांनी तुळजापुरात माध्यमाशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मनापासून आभार. आम्ही आमच्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या होत्या. त्या मागण्या त्यांनी मान्य केल्या. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असली तरी त्याचा इतर समाजावर अन्याय होणार नाही. त्यासाठी मी स्वतः जातीने लक्ष घालेन, असेही संभाजीराजे म्हणाले. 

राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्याबाबत सकल मराठा समाजाने केलेल्या पाठपुराव्याला आणि त्यासाठीच्या लढ्याला यश आले आहे, असेही खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. 

हेही वाचा : एमपीएससीची परीक्षा सरकारने पुढे ढकलली 

मुंबई : राज्य लोकसेवा आयोगाची रविवारी (ता. 11 ऑक्‍टोबर) होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (ता. 9 ऑक्‍टोबर) सायंकाळी जाहीर केले. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळावा, तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. 

"एमपीएससी'कडून घेण्यात येणारी दोनशे जागांसाठीची परीक्षा या पूर्वी दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अभ्यासासाठी वेळ मिळावा, अशी मागणी करण्यात आली होती. तसेच, कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही काही ठिकाणी कायम आहे. काही विद्यार्थ्यांना कोरोना झालेला आहे. हा सर्व विचार करून रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, असे ठाकरे यांनी या वेळी सांगितले. 

एमपीएससीने तारखा ठरविल्यानंतरच ही परीक्षा घेण्यात येईल. त्यावेळी मात्र ही परीक्षा कोणत्याही परिस्थितीत पुढे ढकलण्यात येणार नाही, असे ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान, रविवारी (ता. 11) होणाऱ्या परीक्षेला जे विद्यार्थी बसणार होते. ते सर्व विद्यार्थी पुढील परीक्षा देण्यासाठी पात्र असतील, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. 

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर राज्यातील मराठा समाजात असंतोषाचे वातावरण होते. विशेषतः समाजातील तरुण आक्रमक झाले होते. त्यातच गेल्या काही दिवसांपासून मराठा संघटना आणि नेतेमंडळींकडून एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी आक्रमकपणे केली जात होती. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख