टिव्हीवर टीवटीव करणाऱ्यांनी लोकांमध्ये यावं..संभाजीराजेंचा मेटे, गायकवाड यांना टोला - Sambhaji Raje targets Vinayak Mete, Praveen Gaikwad | Politics Marathi News - Sarkarnama

टिव्हीवर टीवटीव करणाऱ्यांनी लोकांमध्ये यावं..संभाजीराजेंचा मेटे, गायकवाड यांना टोला

विश्वभूषण लिमये 
शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020

राज्य सरकार बार्टी सारखी संस्था चालवू शकते, मग सारथी संस्था का नाही चालवू शकत, असा प्रश्न संभाजीराजेंनी यावेळी उपस्थित केला. 

तुळजापूर : "मराठा समाजाच्या मांडीला मांडी लावून मी बसलोय.. अन् तोच माझा राजवाडा आहे. अनेक नेते मंडळी टीव्ही वर बोलतात टीवटीव् करतात, धाडस असलं तर नागरिकांमध्ये या, असा टोला छत्रपती संभाजीराजे यांनी नाव न घेता आमदार विनायक मेटे यांना लगावला आहे. संभाजीराजेंनी प्रवीण गायकवाड यांच्यावर अप्रत्यक्ष  टोला लगावला. मराठा समाजात दोन गट पडणाऱ्यांना हाणून पाडा, असे संभाजीराजे म्हणाले.

मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी आजपासून तुळजापूर येथे मराठा क्रांती ठोक मोर्च्याच्या तिसऱ्या पर्वाला सुरूवात झाली आहे. यावेळी छत्रपती संभाजी राजे बोलत होते. संभाजीराजे म्हणाले की मराठा समाजासाठी आंदोलन करताना संयम पाळा. आम्हाला दिल्लीला पाठवू नका. आम्ही आमच्या बळावर दिल्ली काबीज करू शकतो मी कोणत्याही पक्षाचा खासदार नाही, राष्ट्रपती नियुक्ती खासदार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर हजारोंचे मोर्च लाखोंमध्ये बदलायला वेळ लागणार नाही. राज्य सरकार बार्टी सारखी संस्था चालवू शकते, मग सारथी संस्था का नाही चालवू शकत, असा प्रश्न संभाजीराजेंनी यावेळी उपस्थित केला. 
 

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाअध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी मराठा आरक्षणाबाबत नुकतेच व्यक्तव्य केलं होतं. गायकवाड म्हणाले होते की संभाजीराजेंना आरक्षण मागण्याचा नैतिक अधिकार नाही. याबाबत संभाजीराजेंनी प्रवीण गायकवाड यांचे नाव न घेता त्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. मराठा समाजात दोन गट पडणाऱ्यांना हाणून पाडा, असे संभाजीराजे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी एमपीएससीची परीक्षा दोन महिने पुढे ढकलावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. मराठा आरक्षणाचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहचविणार असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. 

 

आज तुळजापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चैाकातून या मोर्चास प्रारंभ झाला. तुळजाभवानी मंदीर परिसरात या मोर्चाचा समारोप झाला.  औरंगाबाद येथे काल पत्रकार परिषदेत बोलतांना केरे पाटील यांनी तुळजापूरातून सुरू होणाऱ्या मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाबद्दल माहिती दिली होती. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे याचा अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत राज्य सरकारने युपीएससी, एमपीएससीच्या परीक्षा घेऊ नये, अशी आमची मागणी आहे.

पण सरकारने या परिक्षा घेण्याचा घाट घातला आहे. तेव्हा जिथे जिथे या परिक्षा घेतल्या जातील तिथे तिथे गनिमी काव्याने जाऊन त्या उधळण्याचे नियोजन मराठा क्रांती ठोक मोर्चाने केले आहे. आम्ही या परिक्षा कदापि होऊ देणार नाही, असेही केरे पाटील यांनी सांगितले होते. गेल्या महिनाभरापासून मराठा आरक्षणासाठी राज्यभरात ठोक मोर्चाच्या वतीने राजकीय नेते, मंत्री, आमदार, खासदार यांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. आता पुन्हा एकदा झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा सज्ज झाला आहे. 

शिवसेनेचे राज्यमंत्री यांनी मराठा तरूणाला केलेल्या आर्वाच्य शिवीगाळीचा जाब देखील आम्ही अब्दुल सत्तार यांना विचारणार आहोत. सत्तार यांच्या या विधानबद्दल शिवसेनेने त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा, तसेच सत्तार यांनी मराठा समाजाचाी माफी मागावी, अन्यथा मराठा क्रांती ठोक मोर्चा त्यांना महाराष्ट्रात तर फिरू देणार नाहीच, पण जोपर्यंत ते माफी मागत नाही तोपर्यत आम्ही त्यांच्याही घरासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे केरे पाटील यांनी सांगतिले.  

Edited  by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख