संभाजी ब्रिगेडने राज्य सरकारचे घातले श्राद्ध...  - Sambhaji Brigade agitation against the state government   | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
सरपंचपदाचे आरक्षण नव्यानेच होणार आणि प्रशासकांच्या कारभाराची चौकशीही होणार

संभाजी ब्रिगेडने राज्य सरकारचे घातले श्राद्ध... 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 3 जानेवारी 2021

श्री. श्री. रवीशंकर यांच्याविरुद्ध वर्षभरानंतरही पोलिसांनी कारवाई न केल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडने स्मशानभूमीत राज्य सरकारचे अखेर श्राद्धच घातले.

पिंपरी : छत्रपती शिवाजी महाराज यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी अध्यात्मिक गुरु श्री. श्री. रवीशंकर यांच्याविरुद्ध वर्षभरानंतरही पोलिसांनी कारवाई न केल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडने पिंपरी - चिंचवडमधील स्मशानभूमीत राज्य सरकारचे अखेर श्राद्धच घातले.

यावेळी स्मशानभूमीत पोलिस बंदोबस्त होता. याप्रकरणी भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल झाला नाही, तर ब्रिगेड राज्यभर आणखी तीव्र आंदोलन करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

कोरोना लॉकडाउनमुळे सध्या शहरात दिवसा जमावबंदी, तर रात्री संचारबंदी लागू आहे. त्यामुळे ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना हे आंदोलन न करण्याची नोटीस पोलिसांनी बजावली होती. नंतर, मात्र, पाचपेक्षा कमी व्यक्तींनी ते करण्याच्या अटीवर पोलिसांनी परवानगी दिली. यानिमित्ताने प्रथमच थेरगाव स्मशानभूमीत या आंदोलनासाठी पोलिसांचा फौजफाटा सकाळी तैनात करण्यात आला होता.

ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात संघटक ज्ञानेश्वर लोभे, माऊली बोराटे, योगेश साळवी, महेश कांबळे, मराठा जोडो अभियानाचे प्रदेश अध्यक्ष नितीन जाधव आदी सहभागी झाले होते. त्यांनी श्राद्ध विधीनंतर श्रद्धांजली वाहून सरकारच्या कारभाराचा निषेधही केला.

मागील सरकारच्या काळात हा प्रकार घडला होता. त्यांनी तसेच आताच्याही सरकारने याप्रकरणी कारवाई न केल्याने हे आंदोलन करावे लागले, असे काळे यांनी सांगितले. ते म्हणाले, रविशंकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचेबद्दल आक्षेपार्ह लिखाण केले. आपल्या अधिकृत फेसबूक पेजवर व्हिडीओव्दारे महाराजांची बदनामी केल्याने भावना दुखावल्या आहेत. त्यावर त्वरित कारवाई होणे गरजेचे होते. मात्र, ती अद्यापही झालेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वच  नेते छत्रपतींच्या नावाचा वापर करून सत्तेत येतात. मात्र, त्यांची बदनामी करणाऱ्यावर गुन्हे दाखल करायला टाळाटाळ करतात.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडेही अनेक वेळेला पाठपुरावा करूनही त्यांनी दखल घेतली नाही. महाविकास आघाडीला छत्रपतींच्या नावाचा विसर पडलेला आहे. त्यामुळे त्यांना जागे करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख