दारुची दुकाने उघडणाऱ्या सरकारला जनतेची फारच काळजी : संभाजी भिडेंची उपहासात्मक टीका  - Sambhaji Bhide criticizes Thackeray government for not opening temples | Politics Marathi News - Sarkarnama

दारुची दुकाने उघडणाऱ्या सरकारला जनतेची फारच काळजी : संभाजी भिडेंची उपहासात्मक टीका 

सरकारनामा ब्यूरो 
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

कोरोना महामारीमुळे बहुसंख्य लोक मरणार आहेत, अशी भीती सरकार निर्माण करत आहे.

नृसिंहवाडी (जि. कोल्हापूर) : राज्यात उपहारगृहे, दारूची दुकाने आणि सिनेमागृहे सुरू आहेत. परंतु मंदिरे, शाळा, बंद आहेत. या राज्यकर्त्यांना समाजाची फारच काळजी दिसत आहे? अशी उपहासात्मक टीका शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी आज (ता. 9 नोव्हेंबर) ठाकरे सरकारवर केली. 

संभाजी भिडे हे श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सरकारवर टीका केली. भिडे म्हणाले की, कोरोना महामारीची भीती निर्माण केली गेली आहे. क्वारंटाइनच्या नावाखाली एकमेकाला एकमेकापासून दूर ठेवण्यात आले आहे. आजपर्यंत जे मृत्यू झाले आहेत, त्यातील  कोरोनापेक्षा भीतीमुळेच जास्त मृत्युमुखी पडले आहेत. 

शेकडो वर्षांपासून आळंदी ते पंढरपूर वारी सुरू आहे, ती परकीयांनी देखील बंद केली नाही. या राज्यकर्त्यांना कोरोना महामारीमध्ये जनतेची काळजी फारच वाटत आहे. यथा राजा, तथा प्रजा. जे जे समाजाला घातक आहे, ते या सरकारने सुरू केले. मात्र, सदभावना व्यक्त करणारी मंदिरे मात्र बंद ठेवली आहेत, हे कशाचे द्योतक आहे, असा सवाल संभाजी भिडे यांनी उपस्थित केला. 

कोरोना महामारीमुळे बहुसंख्य लोक मरणार आहेत, अशी भीती सरकार निर्माण करत आहे, असा आरोपही संभाजी भिडे यांनी शेवटी बोलताना केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख