शासन दरबारी मुंडे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांचे लाड होतात..पण.. - Sadabhau Khot's criticism of Tukaram Munde | Politics Marathi News - Sarkarnama

शासन दरबारी मुंडे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांचे लाड होतात..पण..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

जिल्हाधिकाऱ्यांकडे लोकप्रतिनिधी गेले तर त्यांना अपमानीत करणं हे कोणत्या चौकटीत बसणार आहे. त्यांचा मलाही काही वाईट अनुभव आला आहे, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. 

मुंबई : "शासन दरबारी तुकाराम मुंडे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांचे लाड होतात, कोणाची तरी जिरवायची म्हणून ते त्यांचा वापर करतात, पण एक दिवस ते आपलीचं जिरवतात," असं मत माजीमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केलं आहे.

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याबाबत मला आदर आहे. ते सामान्य कुंटुंबातून आलेलं व्यक्तीमत्व आहे. पण आपल्याला एखादे पद स्वकर्तृत्वाने मिळाले तर त्याचा गर्व असावा, पण दर्प असून नये. मी सोडून सर्व उपटसंभ. जे काळ कळतं ते फक्त मलाच, ही हुकुमशाही वृत्ती आहे. अशी माणसं राज्यकर्त्यांना खलनायक बनवून मोठी झाली नाही. समाजाला हिरो आवडतो. पण हिरो स्टंटबाज असतात, हे समाजासाठी घातक असतात.

मुंडेसाहेब सोलापूरला जिल्हाधिकारी होते तेव्हा पालकमंत्री विजयकुमार देशमुख होते. ते देशमुखांचही काम ऐकत नसे. त्यासाठी त्यांना आंदोलन करावे लागले. नागरिक लोकप्रतिनिधाकडे कामे घेऊन येतात, त्यांना त्यांचं काम होईल, ही अपेक्षा असते. पण जिल्हाधिकाऱ्यांकडे लोकप्रतिनिधी गेले तर त्यांना अपमानीत करणं हे कोणत्या चौकटीत बसणार आहे. त्यांचा मलाही काही वाईट अनुभव आला आहे, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितलं. 

सदाभाऊ खोत म्हणाले, "मी माढा लोकसभा मतदार संघातून निवडणुक लढविली. २०१५ मध्ये पाण्याचा फार दुष्काळ होता. जलयुक्तच काम जोरात सुरू होते. मुंडेचं कौतुक फार होत होते. सोलापूर जिल्ह्यात ना छावनी ना टाँकर. पण सागोंला, मंगळवेढा, करमाळा या भागात मी आणि पालकमंत्र्यांनी दौरा केला होता. लोकाच्या डोळ्यात पाणी असायचं. आम्हाला टॅंकर द्या... अशी त्यांची मागणी असायची. तीन किलोमीटरवरून लोक पाणी आणत होते. चारा नव्हता. काही लोकांनी जनावरे पाहूण्याची गावी घेऊन गेले. करमाळा तालुक्यातील शेतकरी ऊसमानाबादमध्ये चारा छावनीत जनावरे घेऊन गेली. आम्ही पंढरपूरला मोर्चा ही काढला होता. छावणी माफीया व टॅकर माफीया यांना आळा बसावा, म्हणून काही लोक कौतुक करायचे." 

"काही शेतकऱ्यांचे जर्शी दहा ते वीस गाईचे गोटे होते. विहीरीनं तळ गाठला होता. आख्खं घरदार पाण्यासाठी धावत असायचे...तर सरकारी बंगला, नोकरचाकर, गाडी. त्यांच्या घरात नळाला पाणी. त्याना आमचं काय दु:ख समजणार. ते फक्त जलयुक्त कामांची एकच टिमकी वाजवीत होते. एका मराठी वृत्तवाहिनीनं पाणी दार माणूस म्हणून त्याचा सत्कार घेतला होता.

मी पण त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. मी बोलताना मुंडेंना म्हणालो, ताजमहालाचे कौतुक शाहाजानला आहे, कारागीरांना नाही. पाणी अडविण्यासाठी केलेल्या कामामुळे भांडी भरतीलही पण कोरड्या भांड्यात बघून तहान भागत नाही. नवी मुंबईला आयुक्त म्हणुन त्यांची बदली झाली. मी त्यावेळी मंत्री होतो.

आमदार मंदाताई म्हात्रे यांना भेटल्यावर मी सहज त्यांना बोलून गेलो. कशाला या माणसाला घेतलं. त्यावेळी त्या म्हणाल्या 'नगरपालिकेत आमदार गणेश नाईक यांचं कोणाचेच ऐकत नाहीत. म्हणून यांना आणलय.' आणि तीन महिन्यानंतर 'तुकाराम मुंडे हटाव'च्या मोहीमेत मंदाताई अग्रेसर होत्या. त्यामुळे मला एक जाणवले की शासन दरबारी बऱयाच वेळा अशा आधिकाऱ्यांचे लाड होतात. कोणाची तरी जिरविण्यासाठी आपण त्यांचा वापर करतो. पण एक दिवस ती व्यक्ती आपलीच जिरवते, असं खोत यांनी नमूद केलं. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख