सचिन वाझेंना अटक होऊ शकते..न्यायालयानं अर्ज फेटाळला..  - Sachin Waze interim application has been rejected by the court | Politics Marathi News - Sarkarnama

सचिन वाझेंना अटक होऊ शकते..न्यायालयानं अर्ज फेटाळला.. 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 13 मार्च 2021

सचिन वाझे यांना अटकेपासून संरक्षण नसल्याने त्यांचा गुन्ह्यात सहभाग आढळल्यास त्यांच्यावर अटकेची कारवाई होऊ शकते. 

मुंबई : पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सचिन वाझे यांना अंतरिम दिलासा देण्यास कोर्टाचा नकार दिला आहे.  सचिन वाझेंचा अंतरिम अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. माञ, अटक पुर्व जामिनावर १९ मार्च रोजी होणार सुनावणी आहे. सचिन वाझे यांना अटकेपासून संरक्षण नसल्याने त्यांचा गुन्ह्यात सहभाग आढळल्यास त्यांच्यावर अटकेची कारवाई होऊ शकते. 

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी सचिन वाझे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. पण त्यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. वाझेंना अटक करण्याची मागणी भाजपने  केली आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. याबाबतचे टि्वट सोमय्या यांनी केलं आहे. 

आपल्या टि्वटमध्ये किरीट सोमय्या म्हणतात, "शिवसेनचे माजी प्रवक्ता पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी आता अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली आहे. एटीएस चा आत्ता निष्कर्ष आहे की मनसुख हिरेन यांची हत्या झाली आहे. मग ठाकरे सरकार सचिन वाझे यांना अटक का करत नाही."

सचिन वाझे याच्यासारख्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला सरकार इतके का घाबरते असा प्रश्‍न भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केला. या सरकारचे असे नेमके काय गुपीत त्याच्याकडे आहे जे सरकारला त्रासदायक आहे, असे पाटील यांनी म्हटले आहे.

सचिन वाझे यांनी अटकेच्या भीतीने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. मनसुख हिरेन यांची पत्नी विमला हिरेन यांनी दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) दिलेल्या तक्रारीत सचिन वाझे यांच्याविरोधात आरोप केल्यानंतर शुक्रवारी वाझे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.  

सचिन वाझे यांची मुंबई क्राईम ब्रँचमधून  काल बदली करण्यात आली आहे. मनसुख हिरेन प्रकरणात एन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. वाझे यांची बदली करण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधीमंडळात केली होती. 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जी जिलेटिन भरलेली गाडी सापडली त्याबद्दलचा तपास केंद्रीय गृहखात्याने कालच राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपविला. हिरेन यांच्या ताब्यातील ही गाडीच अंबानी यांच्या घरासमोर होती. त्यानंतरच हिरेन यांचा मृतदेह ठाण्याच्या खाडीत सापडला. अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांचा तपास सुरवातील सचिन वाझे यांच्याकडे होता. त्यामुळे हिरेन आणि वाझे यांचे संभाषण झालेले होते. त्यानंतरच वाझे यांचे नाव गेले काही दिवस चर्चेत होते. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमकपणे थेट वाझे यांच्या अटकेची मागणी केली होती. हिरेन यांच्या पत्नीनेही वाझेंनी आपल्या पतीचा खून केल्याचा आरोप केला आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख