सचिन वाझेंनी बनावट नंबरप्लेट खाडीत फेकल्या...NIA ला संशय.. - Sachin Vaze throws fake number plate Thrown  water NIA Doubt | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सचिन वाझेंनी बनावट नंबरप्लेट खाडीत फेकल्या...NIA ला संशय..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 20 मार्च 2021

पुरावे नष्ट करण्यासाठी वाझेंनी काही बनावट नंबरप्लेट पाण्यात म्हणजेच खाडीत फेकल्याची माहिती समोर येत आहे. 

मुंबई : निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए)च्या तपासात पुरावे नष्ट करण्यासाठी वाझेंनी काही बनावट नंबरप्लेट पाण्यात म्हणजेच खाडीत फेकल्याची माहिती समोर येत आहे. 

पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने सीसीटीव्ही (CCTV), आणि डिव्हिआरमध्येही छेडछाड केली असल्याचे तपासात समोर आल्याची माहिती एनआयए (NIA)च्या सूञांकडून समजते. सचिन वाझे तपासाला सहकार्य करत नसून त्यांच्याकडून गहाळ झालेल्या मोबाइलची माहिती ते लपवत असल्याचा एनआयएला (NIA) ला संशय आहे. 

राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची सध्या चौकशी सुरु आहे. काल रात्री पावणेअकरा वाजता उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर त्यांना आणले होते. त्यांना कुर्ता घालून चालायला लावलं. मुकेश अंबानींचं निवासस्थान अँटिलियाच्या बाहेर या घटनेचे नाट्यरुपांतर करण्यात आल्याची माहिती 'एनडीटीव्ही'ने दिली आहे. 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके प्रकरणात जी गाडी दिसते त्या गाडीमागे पीपीई किट घालून जी व्यक्ती आहे, ती सचिन वाझे असावी, असा 'एनआयए'ला संशय आहे. या प्रकरणातील घटनाक्रम समजून घेण्यासाठी 'एनआयए'ने काल रात्री अंबानींच्या घराबाहेर नाट्यरुपांतर केलं. वाझेंना तीन वेळा पर्ट- पँटमध्ये चालण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना कुर्ता आणि डोक्यावर रूमाल टाकून चालण्यास सांगितले. कारण त्या गाडीच्या मागे जी व्यक्ती दिसते, त्या व्यक्तीनं सैल कुर्ता घातलेला होता. 'एनआयए'च्या म्हणण्यानुसार ती व्यक्ती सचिन वाझे आहेत.

काल सचिन वाझे प्रकरणाची सुनावणी न्यायालयासमोर झाली, यावेळी 'एनआयए'ने न्यायालयात आपले लेखी उत्तर सादर केले. आता 30 मार्च रोजी पुढील सुनावणी आहे. याप्रकरणात काल एनआयए आणि एटीएस यांना 17 जानेवारीचे सीसीटीवी फुटेज मिळाले आहेत, यात मनसुख हिरेन आणि वाझे एकत्र असल्याचे दिसले. 

"पोलिस अधिकारी सचिन वाझेंबाबत तपासात चुक झाली, अशी चुक पुढे पोलिस करणार नाहीत, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. वाझें प्रकरणामुळे सरकारच्या विश्वासार्हतेला तडा जाणार नाही," असेही राऊत यांनी काल स्पष्ट केले.  
Edited  by :  Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख