भाजपचे 'मॉडेल' धोक्यात आल्याने नड्डा, जावडेकर यांची धावपळ सुरू...सावंतांचा टोला   - Sachin Sawant's criticism on JP Nadda and Prakash Javadekar  | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपचे 'मॉडेल' धोक्यात आल्याने नड्डा, जावडेकर यांची धावपळ सुरू...सावंतांचा टोला  

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020

टीआरपी व समाजमाध्यमे हे भाजपचे मॉडेल धोक्यात आल्यामुळेच जे. पी. नड्डा व प्रकाश जावडेकर यांची धावपळ सुरु असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

मुंबई : टीआरपी रॅकेट तसेच समाजमाध्यमांवर निर्माण झालेली बोगस अकाऊंट या सर्व षडयंत्रावर स्वार होऊन राजकारणाच्या पोळ्या भाजायच्या हे भाजपचे कारस्थान आहे. हे मॉडेल धोक्यात येणे त्यांना परवडणारे नाही व म्हणूनच आता सुशांतसिंहने आत्महत्या केली, असे सांगणारा 'एम्स'चा रिपोर्ट नाकारावा, असा 'दबाव सीबीआय'वर येण्याची शक्यता आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

मुंबई पोलिसांनी उघड केलेला टीआरपी घोटाळा हे लोकशाहीसमोरचं मोठं संकट आहे. त्याचमुळे लोकशाहीच्या रक्षणासाठी मुंबई पोलिसांनी उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे, असेही सावंत यांनी म्हटले आहे. टीआरपी व समाजमाध्यमे हे भाजपचे मॉडेल धोक्यात आल्यामुळेच जे. पी. नड्डा व प्रकाश जावडेकर यांची धावपळ सुरु असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

टीआरपी रॅकेटच्या माध्यमातून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला कमकुवत करण्याचा प्रयत्न तर झालाच पण इतर माध्यमांवर अन्याय करून हजारो कोटींचा महसुलही हडपण्याचा प्रयत्न झाला. मात्र, एखाद्या मोठ्या षडयंत्रासाठी या रॅकेटचा कसा उपयोग करता येतो, हा राजकीय कोन देखील सुशांतसिंह राजपूत प्रकरणाच्या निमित्ताने समोर आला.

या प्रकरणात काही दूरचित्रवाणी वाहिन्यांनी जे केलं त्यातून जनभावना आणि राजकारणाची दिशा तयार करण्यात आली. आम्ही सांगतो तेच सत्य आहे व तेच लोकांना पहायचे आहे, असे भासविण्यात आले. त्यामुळे इतर वाहिन्याही त्यांच्यामागे आल्या. त्याआधारे राजकीय डावपेच खेळले गेले. त्यासाठी समाजमाध्यमांवर बोगस अकाऊंट करणे, वेगवेगळे चॅनल चालवणे हे प्रकार झाले, असेही सावंत यांनी सांगितले.    

या सर्व षडयंत्रावर स्वार होऊन राजकारणाच्या पोळ्या भाजायच्या हे भारतीय जनता पक्षाचे कारस्थान आहे. या बोगस चॅनलच्या व मॉडेलचा उपयोग भाजपच्या प्रचारासाठी व प्रसारासाठी झाला. त्यामुळे ते मॉडेल संकटात येणे भाजपला परडवणार नाही. त्यामुळे सुशांतसिंह प्रकरणाच्या तपासासाठी तीन तीन राष्ट्रीय तपाससंस्था कामाला लागल्या. ज्या सीबीआयने कामाचा ताण आहे, असे सांगून दाभोलकर प्रकरणाचा तपास नाकारला होता. त्यांनी सुशांतसिंह प्रकरण तपासासाठी पटकन ताब्यात घेतले. म्हणजे त्यांच्यावर किती दबाव आहे, हे दिसून येते. आता हे मॉडेल संकटात आल्याने सुशांतसिंह ने आत्महत्या केली असे सांगणारा एम्सचा अहवाल नाकारावा, असा दबाव सीबीआयवर येण्याची शक्यता आहे, असा आरोपही सावंत यांनी केला. 

 Edited  by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख