केंद्रांच्या पॅकेजमधून किती ‘प्रोत्साहन’ मिळते ते भविष्यात दिसेल.. शिवसेनेचा टोला   - Saamana Editorial on Diwali And Economy crisis | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

केंद्रांच्या पॅकेजमधून किती ‘प्रोत्साहन’ मिळते ते भविष्यात दिसेल.. शिवसेनेचा टोला  

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

दिवाळीच्या मुहूर्तावर धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने हे ‘प्रोत्साहन पॅकेज’ जाहीर केले. त्यामुळे अर्थव्यवस्थेला आणि रोजगारनिर्मितीला किती ‘प्रोत्साहन’ मिळते ते भविष्यात दिसेल, असा टोला केंद्रसरकारला शिवसेनेचे मुखपत्र सामनातून लगावला आहे. 

मुंबई : ‘आत्मनिर्भर हिंदुस्थान-3’ची घोषणा करताना केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 2 लाख 64 हजार कोटी रुपयांचे आणखी एक पॅकेज जाहीर केले आहे. त्यातही अनेक घोषणा, सवलती, आश्वासने देण्यात आली आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने हे ‘प्रोत्साहन पॅकेज’ जाहीर केले. त्यामुळे अर्थव्यवस्थेला आणि रोजगारनिर्मितीला किती ‘प्रोत्साहन’ मिळते ते भविष्यात दिसेल, असा टोला केंद्रसरकारला शिवसेनेचे मुखपत्र सामनातून लगावला आहे. 

केद्रातील सरकारने काही लाख कोटींचे पॅकेज मागे जाहीर केले. अर्थव्यवस्थेला ‘बूस्टर डोस’ दिला असे आव आणीत सांगितले ; पण ते पॅकेज पुठे जिरले, त्यातून काय उगवले ते सरकारलाच माहीत, अशी टीका सामनाच्या अग्रलेखात करण्यात आली आहे. देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळी सण साजरा केला जात आहे. भारतीय संस्कृतीत दिवाळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने दिवाळी साजरी केली जात आहे. दिवाळीच्या लक्ष लक्ष दिव्यांच्या प्रकाशात कोरोनाचा अंधार कायमचा दूर होऊ दे!, अशी आशा वर्तवण्यात आली आहे.

तूर्त तरी कोरोनाचे भय थोडे बाजूला ठेवून दिवाळीच्या आनंदाचा, चैतन्याचा आणि उत्साहाचाच विचार सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे आणि तो बाजारपेठांमधील गर्दीतून दिसत आहे. ऑनलाइन शॉपिंगही जोरात आहे. हा उत्साह चांगल्या भविष्याचा शुभशपुनच आहे, फक्त त्याला कोरोना निर्बंधांचे बंधन घालायला जनतेने विसरू नये इतकेच! इडा-पीडा बाहेर जाते आणि बाहेरची लक्ष्मी घरात येते असा हा दिवाळी सण. पुढील तीन दिवस महाराष्ट्रासह देशातील घराघरात हेच चैतन्याचे, मांगल्याचे वातावरण असेल. दिवाळीच्या लक्ष लक्ष दिव्यांच्या प्रकाशात कोरोनाचा अंधार कायमचा दूर होऊ दे! कोरोनाची पीडा बाहेर जाऊ दे आणि बाहेरची लक्ष्मी घराघरांत येऊ दे, असे अग्रलेखात म्हटले आहे.

काय म्हटलं सामनाच्या अग्रलेखात ?

बाजारात फिरताना कोरोनाची जी बंधने आहेत ती पाळणे सगळय़ांच्याच हिताचे राहील. दिवाळी हा प्रकाशाचा, दिव्यांचा सण, त्यामुळे पणत्यांनी आणि दिव्यांच्या रोषणाईने परिसर उजळणारच आहे. तो उजळायलाच हवा, पण प्रश्न आहे फटाक्यांचा. कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक हानिकारक ठरतो तो माणसाच्या श्वसन यंत्रणा आणि फुप्फुसांना. साहजिकच, कोरोनाचे संकट कायम असताना फटाक्यांचे प्रदूषण करणे आणि संसर्ग वाढविणे परवडणारे नाही. दिवाळी साजरी करताना त्याचे भान सर्वांनीच ठेवायला हवे. दिव्यांची रोषणाई करा, फटाक्यांच्या आतषबाजीला आवर घाला. नवीन खरेदीसाठी दिवाळीचा मुहूर्त नक्की साधा, पण कोरोनाच्या मर्यादांचे पालन करा. कोरोनामुळे आलेले लॉक डाऊन, त्यामुळे ‘डाऊन’ झालेली अर्थव्यवस्था आणि त्यातून बिघडलेले अर्थचक्र या पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळी आली आहे. त्यात यंदाही अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाच्या अवेळी तडाख्यांनी बळीराजाचे हातातोंडाशी आलेले खरिपाचे पीक हिरावून नेले. काही कोटी लोकांचे रोजगार गेले आहेत. कोटय़वधी बेरोजगार तरुण नोकऱयांपासून वंचित आहेत. सर्वच क्षेत्रांत मंदीची लाट आहे. नोटबंदी आणि जीएसटीमुळे अर्थव्यवस्था मोडकळीस आली होतीच, त्यात कोरोना आणि लॉक डाऊनमुळे तिचे पार कंबरडेच मोडले आहे. केद्रातील सरकारने काही लाख कोटींचे पॅकेज मागे जाहीर केले. अर्थव्यवस्थेला ‘बूस्टर डोस’ दिला असे आव आणीत सांगितले; पण ते पॅकेज पुठे जिरले, त्यातून काय उगवले ते सरकारलाच माहीत. आताही ‘आत्मनिर्भर हिंदुस्थान-3’ची घोषणा करताना केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 2 लाख 64 हजार कोटी रुपयांचे आणखी एक पॅकेज जाहीर केले आहे. त्यातही अनेक घोषणा, सवलती, आश्वासने देण्यात आली आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने हे ‘प्रोत्साहन पॅकेज’ जाहीर केले. त्यामुळे अर्थव्यवस्थेला आणि रोजगारनिर्मितीला किती ‘प्रोत्साहन’ मिळते ते भविष्यात दिसेलच. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख