जे सत्तेवर येतात, तेच नखशिखांत भ्रष्टाचारात बुडतात

सत्तेतून पैसा, पैशातून पुनः पुन्हा सत्ता या चक्रात आज सगळेच सापडले आहेत.
nagrale27.jpg
nagrale27.jpg

मुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी भ्रष्टाचार हा सरकारी यंत्रणेचा भाग बनला आहे, असे एक विधान नुकतेच केले आहे. यावरून 'सामना'च्या अग्रलेखात सरकारी यंत्रणा, राजकारण, प्रशासन यावर टीका करण्यात आली आहे.

भ्रष्टाचार हा सरकारी यंत्रणेचा भाग बनला आहे, असे एक विधान राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी केले. नगराळे यांचे विधान धक्कादायक, खळबळजनक आहे असे ज्यांना वाटते ते मूर्खांच्या नंदनवनात फिरत आहेत. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी सहजपणे केलेले हे सत्यकथन आहे. नगराळे यांनी एक प्रकारे जनभावनाच व्यक्त केली.

‘लोकपाल’ हवा, त्यामुळे भ्रष्टाचारावर नियंत्रण राहील या अण्णांच्या मागणीस तेव्हा उघड पाठिंबा देणाऱया भाजपनेही ‘लोकपाल’ आणून भ्रष्टाचाराला वेसण घातली नाही. कारण भ्रष्टाचार हा शेवटी यंत्रणेचाच भाग असतो व सत्ता मिळविण्यासाठी, टिकविण्यासाठी, बहुमत विकत घेण्यासाठी भ्रष्टाचाराचाच पैसा लागतो. निवडणुका लढविण्यासाठी जे ‘बजेट’ तयार करावे लागते ते पाहिले की, सामान्य माणूस चक्रावून जाईल. बिहार व प. बंगालसारख्या राज्यांत सगळय़ांनीच पैशांचा पाऊस पाडला आहे. हा पैसा काही जमिनीतून उगवलेला नाही. लाखो कोटींचा काळा पैसा परदेशी बँकांत आहे. हा भ्रष्टाचाराचा पैसा पुन्हा देशात आणू असे सांगितले गेले, त्याचे पुढे काहीच झाले नाही, असे अग्रलेखात म्हटलं आहे. 

सामनाच्या अग्रलेखात काय म्हटलं आहे...

सत्तेतून पैसा, पैशातून पुनः पुन्हा सत्ता या चक्रात आज सगळेच सापडले आहेत व पैसा जमविण्याचा मार्ग यंत्रणेतले अधिकारीच दाखवत असतात. निवडणूक हीच भ्रष्टाचाराची गंगोत्री आहे, असे श्री. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणत. ही भ्रष्ट गंगोत्री साफ करणारे एकच शेषन निर्माण झाले. बाकी सब घोडे बारा टके! भ्रष्टाचार हा जगण्याचा आणि यंत्रणेचाच भाग झाला. तुम्ही–आम्ही काय करणार?
 
भ्रष्टाचार हा सरकारी यंत्रणेचा भाग बनला आहे. आम्ही भ्रष्टाचाराचे समर्थन करत नाही. मात्र भ्रष्टाचार आज यंत्रणेचाच भाग बनला आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला सरकारी यंत्रणेमधून खणून काढणे कठीण झाले आहे. आम्ही फक्त लाचलुचपत प्रतिबंधात्मक कारवाया वाढवून अधिकाऱ्यांना भ्रष्ट आचरणापासून दूर ठेवू शकतो, असे नगराळे म्हणतात. नगराळे पुढे म्हणतात ते महत्त्वाचे. ‘‘सरकारी यंत्रणेतून भ्रष्टाचार 100 टक्के दूर करता येऊ शकत नाही. म्हणूनच भ्रष्टाचार रोखण्यासाठी जो कायदा करण्यात आला आहे, तो कायदाही भ्रष्टाचाराला प्रतिबंध करा असे म्हणतो, पण भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करा, असे काही कायदा सांगत नाही,’’ असे हेमंत नगराळे म्हणतात. भ्रष्टाचार हा आपल्या जीवनाचा, राजकारणाचा एक भाग बनला आहे. पैशांनी आपण पृथ्वी आणि इंद्राचे दरबार विकत घेऊ शकतो, ईश्वर-अल्ला, सर्वांना विकत घेऊ शकतो असे मानणारे लोक आपल्या अवतीभवती आहेत, तोपर्यंत सर्वच पातळय़ांवरील भ्रष्टाचार संपेल हे मानण्यात अर्थ नाही. स्नानगृहात सारेच नंगे असतात हे त्यापैकी अनेकांचे समर्थन असू शकेल. 

पैसा हा राजकारणाचा, प्रशासनाचा भाग बनला आहे. मलईदार जागा मिळविण्यासाठी – ज्याला सोप्या भाषेत क्रीम पोस्टिंग म्हणतात, ते पदरात पाडून घेण्यासाठी -सत्ताधारी व अधिकाऱ्यांचे आर्थिक लागेबांधे तयार होतात. पैसे मोजून पदावर आलेला दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी जी ‘राष्ट्रसेवा’ करतो ती थक्क करणारी असते. सिमेंटपासून मातीपर्यंत, पाण्यापासून प्राणवायूपर्यंत, धान्यापासून औषधांपर्यंत सगळय़ाच क्षेत्रांत भ्रष्टाचार होतो. टेबलावर पैसे घेणे हे टेबलाखालून घेण्यापेक्षा चांगले असे सांगण्याचा प्रयत्न होतो; परंतु शेवटी पैसे घेणे हे वाईट आहे, तो भ्रष्टाचार आहे या वस्तुस्थितीत बदल होत नाही हे अनेकांच्या लक्षातच येत नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com